गडचिराेली : मागील वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन हाेणे, अनियमित पाऊस, धान गर्भात असताना वादळी पावसाचा फटका, मध्यंतरी अवकाळी पावसाचा जाेरदार फटका बसल्याने गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे उत्पादन घटले. याचा परिणामही आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीवर झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अडीच लाख क्विंटलने महामंडळाची धान खरेदी घटली आहे.
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने धानाची खरेदी जिल्हाभरात करण्यात आली. महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत खरीप हंगामात ५४ केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी उपविभागात ३९ धान खरेदी केंद्र ठेवण्यात आले हाेते. गडचिराेली हद्दीतील ५४ केंद्रांवरून १० लाख २७ हजार ३४३ क्विंटल तर अहेरी उपविभागातील ३९ केंद्रांवरून ६ लाख २६ हजार २३८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. दाेन्ही कार्यालये मिळून जिल्हाभरात महामंडळाच्या वतीने सन २०२०-२१ या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी याेजनेअंतर्गत एकूण १६ लाख ५३ हजार ५८१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात धान उत्पादनाचा उतारा कमी आला. दरवर्षी प्रतिएकर १७ ते २० पाेती धान शेतकऱ्यांना व्हायचे. यावर्षी शेतकऱ्यांना १० ते १२ पाेती एवढेच उत्पादन हाती आले. शेतकऱ्यांनी १०० टक्के उत्पादनासाठी पूर्ण हंगामात आटापिटा केला. मात्र, शेतकऱ्यांच्या नशिबी ६५ ते ७० टक्केच उत्पादन हाती आले. परिणामी आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास अडीच लाखांनी घटली. गडचिराेली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत गतवर्षीच्या हंगामात ३१ मार्च २०२० पर्यंत एकूण १२ लाख ७ हजार ७१८ क्विंटल धानाची खरेदी झाली. एक महिन्याची मुदत वाढविण्यात आली. दरम्यान, ३० एप्रिल २०२० पर्यंत ही धान खरेदी १२ लाख ८० हजार क्विंटलवर पाेहाेचली.
बाॅक्स... ९८ काेटींचे चुकारे प्रलंबित
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने जिल्हाभरात ३८ हजार ४२१ इतक्या शेतकऱ्यांची आधारभूत किमतीने धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा करण्यात आले. अजूनही १८ हजार ११४ शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांचे तब्बल ९८ काेटी ६९ लाख ९५ हजार रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.
बाॅक्स....
धान खरेदीला मुदतवाढ नाही
गतवर्षीच्या खरीप हंगामात काेराेना संकटामुळे राज्य शासनाच्या वतीने आधारभूत धान खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली हाेती. या एक महिन्याच्या कालावधीत जवळपास दीड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली हाेती. यावर्षीसुद्धा किचकट अटी, शर्ती तसेच ऑनलाईन प्रक्रियेमुळे धान खरेदीच्या कामात गती आली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे धान अजूनही विक्रीअभावी घरीच पडून असल्याची माहिती आहे. धान खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात शासनाने अद्यापही काेणताही निर्णय घेतला नाही.