गडचिराेली : काेराेना महामारी संकटाच्या काळात स्वत:चे आराेग्य जपण्याचे महत्त्व प्रत्येकानाच कळले असल्याने अनेक जण आता व्यायाम व माॅर्निंग वाॅकसाठी घराबाहेर पडत आहेत. पायी चालण्याचे अनेक फायदे असल्याने सकाळी व सायंकाळच्या सुमारास गडचिराेली शहरातील पाच ते सहा प्रमुख मार्गावर शेकडाे नागरिक दिसून येत आहेत. पण उत्तम आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या या बाबी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाला आमंत्रण देणाऱ्याही ठरू शकतात.
राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. यामुळे शरीर अधिक क्रियाशील हाेऊन काम करते. मात्र, काही नागरिक या संधीचा फायदा घेत बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरातील नागरिक चामाेर्शी, धानाेरा, मूल व आरमाेरी या चार प्रमुख मार्गांसह पाेटेगाव, चांदाळा, जिल्हा स्टेडियम, नगरपरिषद बगीचा आदी ठिकाणी सकाळी व सायंकाळच्या सुमारास फिरावयास जात आहेत. विशेष म्हणजे काेराेनाकाळात माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
बाॅक्स.....
पायी चालण्याचे अनेक फायदे
- सकाळी चालण्यामुळे वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा हाेताे.
- हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व सकाळच्या काेवळ्या उन्हातून मिळते.
- चालण्यामुळे एकाचवेळी शारीरिक व मानसिक व्यायाम हाेताे.
- सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही दूर हाेताे.
- चालण्यामुळे तणाव व चिडचिडेपणा दूर हाेण्यास मदत हाेते.
- चालण्यामुळे शरीरातील वजन, जास्तीचे उष्मांक तसेच चरबीचे प्रमाण कमी हाेते.
- नियमित चालण्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
- नियमित चालण्यामुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत हाेते.
बाॅक्स....
पाेलिसांकडून कारवाईत सूट
व्यायाम करणारी मंडळी पहाटे रस्त्यावर धावताना दिसतात तर काही मंडळी सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर शतपावली करीत असतात. व्यायाम आटाेपल्यानंतर प्रत्येकजण घरी जाण्यापूर्वी एका ठिकाणी गाेळा हाेऊन काहीवेळ चर्चाही केली जाते. परिणामी शारीरिक अंतर पाळण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना असल्या तरी पाेलीस व महसूल प्रशासन माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्या लाेकांवर कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. एकूणच पाेलीस व प्रशासनाकडून त्यांना सूट दिली जात आहे.
काेट....
काेराेनाची भीती वाटत नाही का?
गेल्या १० ते १२ वर्षांपासून मी सातत्याने माॅर्निंग वाॅक करत आहे. त्याचा फायदाही मला हाेत आहे. अलीकडच्या काळात काेराेनामुळे खबरदारी म्हणून नियमांचे पालन करत व्यायाम करत आहे.
- शेषराव येलेकर
................................
व्यायाम करताना सायकलिंग हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून सकाळच्या सुमारास सायकलिंग करत आहे. नियमित सायकलिंग व व्यायाम करण्याचा मला आराेग्यासाठी फायदा हाेत आहे. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी पायी चालणे, धावण्यासह व्यायाम करावा.
- समशेर पठाण