गडचिरोली : पावसाळ्याला सुरुवात झाली असून या कालावधीत कोणतीही जीवित, वित्त हानी होऊ नये यासाठी प्रशासन सतर्कता बाळगत उपाययोजना करीत आहे. याअंतर्गत स्थानिक नगर परिषद प्रशासनाने पालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करीत धोकादायक स्थितीत असलेल्या ३७ इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवून सदर इमारती तत्काळ पाडण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा पालिका प्रशासनाद्वारे सक्त कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता न. प. प्रशासनाने शहरातील विविध वार्डातील जर्जर, धोकादायक इमारतींचा सर्वेद्वारे शोध घेतला. या सर्वेक्षणाअंती शहरातील विविध वार्डात ३७ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. या इमारती मुसळधार पावसात कोसळून जीवित वा वित्त हानी होण्याचे भीती व्यक्त करीत न.प. प्रशासनाने संबंधित घर मालकांना नोटीस बजावित सदर इमारती तत्काळ नेस्तनाबूत करण्याचे निर्देश दिले. याकरिता न.प. प्रशासनाने संबंधित मालकांना निश्चित कालावधी जाहीर केला आहे. या कालावधीनंतर इमारती न पाडल्यास प्रशासन स्वत: इमारती पाडण्यास पुढाकार घेणार आहे. तसेच संबंधित घर मालकांवर सक्त कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. पालिका प्रशासनाच्या या आदेशामुळे संबंधित घर मालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
गांधी वार्डात सर्वाधिक १७ धोकादायक घरे
पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक ठरणाऱ्या जीर्णावस्थेतील घरांचा शोध घेण्यासाठी नगरपरिषदच्या वतीने शहरातील वार्डांमध्ये मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान शहरात जवळपास ३७ घरे धोकादायक स्थिती आढळून आले. ज्यामध्ये सर्वाधिक १७ घरे एकट्या गांधी वार्डामध्ये असल्याची माहिती न.प. प्रशासनाने दिली आहे. यामध्ये इंदिरानगर ३, लांझेडा ४, सर्वोदय वार्ड ३, फुले वार्ड २, भातगिरणी परिसर ३, गोकुलनगर २, नेहरू वार्ड २ व कन्नमवार वार्डातील जीर्णावस्थेतील एका घराचा समावेश आहे.
तर... मेहनतीचा मोबदला घेणार
सर्वे दरम्यान जर्जर अवस्थेत जवळपास ३७ घरे आढळून आले. त्यानंतर नगर परिषदने संबंधित घर मालकांना नोटीस बजावून दिलेल्या वेळेत घर पाडण्याची सूचना दिली होती. नोटीस देऊनही घर न पाडल्यास व इमारतीमुळे धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित घर मालकांची राहणार आहे. तसेच नगर परिषदेवर घर पाडण्याची वेळ आल्यास संबधित मालकांकडून मेहनतीचा मोबदला घेण्यात येणार आहे.