अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांचा बँकेत जाण्याचा त्रास वाचावा, यासाठी देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील पंकज वंजारी या तरूणाने गावाच्या बाहेर रस्त्यावरच बँक सेवा सुरू केली आहे. त्याच्या या सेवेचा फायदा जवळपास १० गावातील नागरिक घेत आहेत.लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना मदत म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जनधन बँक खाते, उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी, शेतकरी सन्मान योजना व निराधार नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरूवात केली आहे. सदर पैसे काढण्यासाठी नागरिक बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे शारीरिक अंतर पाळले जात नाही. परिणामी कोरोनाचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागातील नागरिक जास्तीत जास्त हजार ते दोन हजार रुपये बँकेतून काढतात. या नागरिकांना गावातच सुविधा उपलब्ध झाल्यास ते बँकेत गर्दी करणार नाही. ही बाब लक्षात घेऊन पोटगाव येथील उच्च शिक्षीत युवक पंकज वंजारी यांनी बँक सेवा सुरू केली आहे. पंकज यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. नोवोपे मायक्रो बँकींग सिस्टीमच्या मदतीने त्यांना बँकेप्रमाणे रोकड पैसे देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.पोटेगाव-विठ्ठलगाव जोड रस्त्यावर त्यांनी मायक्रो बँक सुरू केली आहे. सकाळी तीन तास व दुपारी दोन तास असे पाच तास सेवा देत आहेत. पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हात स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जाते. त्यानंतर शारीरिक अंतर ठेवून पैसे काढणाऱ्यांची रांग लावली जाते. गावाच्या बाहेर सेवा सुरू केल्याने गावात गर्दी होत नाही. या सेवेचा फायदा पोटगाव परिसरातील डोंगरगाव, चिखली रिठ, चिखली तुकूम, किन्हाळा, मोहटोला, विहिरगाव, पोटगाव, पिंपळगाव, विठ्ठलगाव आदी गावातील नागरिक घेत आहेत. शंकरपूर किंवा देसाईगंज येथे जाण्याचा त्रास वाचला आहे.
गडचिरोलीतील पोटगावच्या तरूणाने रस्त्यावरच सुरू केली बँकसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 3:45 PM
ग्रामीण भागातील नागरिकांचा बँकेत जाण्याचा त्रास वाचावा, यासाठी देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील पंकज वंजारी या तरूणाने गावाच्या बाहेर रस्त्यावरच बँक सेवा सुरू केली आहे.
ठळक मुद्दे१० गावातील नागरिकांना लाभ देसाईगंजात जाण्याचा त्रास वाचला अंतर ठेवून लावली जाते रांग