आलापल्ली : नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आत्मविश्वास हवा. आत्मविश्वास हा यशस्वी कारकिर्दीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आत्मविश्वास बळावल्याने आपण उंची गाठू शकताे. आत्मविश्वास नसलेली व्यक्ती बाहेरच्या परिस्थितीचे गुलाम बनून राहते. यशस्वी लोक आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींनी विचलित न होता यशाचा मार्ग प्रशस्त करतात. त्यामुळे युवकांनी हिमालयावर जाऊन बर्फ विकण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी, असे प्रतिपादन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा वक्ते वकील शेख यांनी केले. नागेपल्ली येथील राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. एम.यू.टिपले हाेते. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. राजेश सूर उपस्थित हाेते. कार्यक्रमाची रूपरेषा अश्विनी कांबळे आणि नूर जब्बार शेख यांनी मांडली. संचालन प्रा. आर. जी. नन्नावरे तर आभार प्रा. एल. जी. वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.