गडचिरोली : आरमोरी तालुक्यात लागोपाठ दोन दिवसात एका महिला व पुरूषाचा बळी घेणाऱ्या वाघाला (टी-९) जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. त्याला ताडोबातील शार्प शुटर टिमने बेशुद्धीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन ताब्यात घेतले. संध्याकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
देसाईगंज जवळच्या कोंढाळा परिसरात अनेक दिवसांपासून वावरणाऱ्या टी-१ आणि टी-२ या वाघ-वाघिणीचा बछडा असलेल्या टी-९ ने आता आपले स्वतंत्र क्षेत्र निर्माण करण्यासाठी आरमोरी तालुक्यात धाव घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी या वाघाने २४ तासांच्या अंतरात अरसोडा व आरमोरी येथील दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे वाघाला जेरबंद करण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती. त्या वाघापासून इतर लोकांना धोका वाढू नये म्हणून वरिष्ठांच्या निर्देशानुसार त्याला बेशुद्ध करून ताब्यात घेण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार सोमवारी संध्याकाळी आरमोरी जवळच्या डम्पिंग यार्ड परिसरात रेड्याची शिकार ठेवून ताडोबातून आलेल्या शार्प शुटर टिमने सापळा लावला होता. वाघ रेड्यावर हल्ला करण्यासाठी येताच त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन डागण्यात आले. यात रेड्याला कोणतीही दुखापत झाली नाही. ही मोहीम वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, प्र.उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे व शुटर अजय मराठे यांच्या चमुने यशस्वी केली. सदर वाघाला आता गोरेवाडाच्या जंगलात सोडले जाणार आहे.