पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : अहेरीत नृत्य स्पर्धा व अपंगांना ट्रायसिकल वाटपअहेरी : विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून देश हितासाठी युवकांनी योगदान द्यावे, आपल्या कलेच्या माध्यमातून देशपातळीवर गडचिरोली जिल्हा व अहेरी शहराचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. युवा कला विकास मंच अहेरी यांच्या वतीने बुधवारी नृत्य स्पर्धा व अपंगांना ट्रायसिकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, न. पं. उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, प्रवीणबाबा, बबूल हकीम, मुतन्ना दोंतुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, आजच्या पिढीमध्ये देश घडविण्याची ताकद आहे. गडचिरोली जिल्ह्यातील युवक मागे राहू नये, यासाठी फ्री इंटरनेटर, वायफाय, स्पर्धा परीक्षा, अभ्यासकेंद्र यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. युवा कला विकास मंचच्या या समाजोपयोगी व कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमाची त्यांनी कौतुक केले. अपंगांना लोकवर्गणीतून ट्रायसिकल खरेदी करून चार अपंगांना त्याचे वितरण करण्यात आले. संचालन पूर्वा दोंतुलवार तर आभार युवा कला विकास मंचचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष समीर पेदापल्लीवार, सचिव अमित दोंतुलवार, राहुल दोंतुलवार, अमोल नार्लावार, रहीत नरहरशेट्टीवार, जीवन नवले, राहुल आर्इंचवार, तुषार पारेलीवार, श्रावण दुडमवार, राहुल गद्देपाकवार, सुचित कोडेलवार, अर्पित उद्धरवार यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)नृत्य स्पर्धेत ४५ स्पर्धकांचा सहभागस्पर्धेत चंद्रपूर, गडचिरोली, वणी आदी परिसरातील ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. एकल नृत्य गटात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत वणी येथील चार वर्षीय बालिका अश्लेषा आवारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक रोहित आवारी याने पटकाविला. ग्रुप डॉन्स गटात स्पार्कन ग्रुप आलापल्लीने प्रथम तर डी व्हायरस ग्रुप चामोर्शीने द्वितीय क्रमांक पटकाविला. कार्यक्रमात लकी लेडीचे बक्षीस वितरित करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रकाश दुर्गे, सिंपल डिखोळकर, रेखा डे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक संजय मोरे, पीएसआय नीलेश सोळंखे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
युवकांनी देशहितासाठी योगदान द्यावे
By admin | Published: February 13, 2016 12:54 AM