गैरआदिवासींच्या हक्कासाठी : पेसा कायद्यात सुधारणा करागडचिरोली : गैरआदिवासींना नोकरभरतीपासून वंचित ठेवणाऱ्या राज्यपालांच्या पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, यासह विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारपासून येथील इंदिरा गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी अधिसूचना काढून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना नोकरभरतीत प्राधान्य दिले आहे. यामुळे गैरआदिवासी समाजातील युवक, युवती नोकरभरतीपासून वंचित राहत आहेत, असा आरोप युकाँ कार्यकर्त्यांनी केला आहे.या उपोषणात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, माजी जिल्हाध्यक्ष सतीश विधाते, लता पेदापल्ली, महेंद्र ब्राम्हणवाडे, संजय घोटेकर, नीतेश राठोड, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे, राजू गारोदे, जीवन कुत्तरमारे, नंदू खानदेशकर, हार्दिक सुचक, गौरव अलाम, राहूल मुनघाटे, अभिजीत धाईत, विक्की घोंगडे, सुमित बारई, आकाश बघेल, मंगेश पोरटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.दरम्यान रविवारी पंकज गुड्डेवार व महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपोषणमंडपात पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती दिली. उपरोक्त मागण्यांसदर्भात आम्ही आमदार व खासदारांच्या कार्यालयापुढे घंटानाद आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधी गैरआदिवासींचे प्रश्न संसद व विधिमंडळात उपस्थित करतील, या हेतूने ते आंदोलन होते. परंतु खासदार व आमदारांनी गैरआदिवासींच्या प्रश्नांवर मौन बाळगले. त्यामुळे आम्ही उपोषण करीत आहोत, असे महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले. उपोषणामुळे प्रश्न सुटले नाही तर पुढे राज्यपालांना जिल्हाभरातून पोस्टकार्ड पाठवू, असेही त्यांनी सांगितले. गैरआदिवासींच्या प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाला योग्य भाव देणे आवश्यक असल्याचे पंकज गुड्डेवार म्हणाले. मेट्रोसारखे प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सध्या कर्जमुक्ती व शेतमालाला भाव या बाबींना प्राधान्य द्यावे, अशी मागणी पंकज गुड्डेवार यांनी केली.राज्य शासनाकडून आमच्या गैरआदिवासीच्या रास्त मागण्यांबाबत ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय बेमुदत साखळी उपोषण मागे घेणार नाही. याशिवाय राज्य व केंद्र शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील गैरआदिवासींच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रास्ता रोको, चक्काजाम, शाळा, महाविद्यालय बंद आदी सारख्या विविध माध्यमातून टप्प्याटप्प्याने युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, अशीही माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. यावेळी युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)आमदाराच्या विधानावर आंदोलक प्रचंड नाराजगडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी इंदिरा गांधी चौकात येऊन उपोषणकर्त्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आणखी ५० वर्ष पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांना स्पष्ट सांगितले, अशी माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या आमदारांना जिल्ह्यातील गैरआदिवासी नागरिकांनीही मतदान करून विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मात्र आता आमदार डॉ. देवराव होळी हे गैरआदिवासी व ओबीसींच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविण्याऐवजी पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा होणार नसल्याचे स्पष्ट सांगितल्याने आम्ही सर्व उपोषणकर्ते आमदाराच्या विधानाप्रती नाराज आहोत, असे ब्राह्मणवाडे यावेळी म्हणाले. दरम्यान उपोषणकर्त्यांनी आमदाराच्या या विधानाचा यावेळी तीव्र शब्दात निषेध केला.या आहेत उपोषणकर्त्यांच्या मागण्याजिल्हा निवड मंडळ स्थापन करुन वर्ग ३ व ४ ची सर्व पदे स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षित ठेवावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, जिल्ह्यातील पोलीस भरतीत स्थानिक उमेदवारांना शंभर टक्के प्राधान्य द्यावे, जातनिहाय जनगणना तत्काळ करावी, शेतकऱ्यांच्या धानाला प्रतीक्विंटल ३ हजार ५०० रुपये भाव द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, आयटीआय व तंत्रनिकेतनमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे वाढलेले शुल्क रद्द करावे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्यावे.
युकाँचे उपोषण सुरू
By admin | Published: August 10, 2015 12:51 AM