राजकीय वर्तुळात उत्सुकता : आरमोरी क्षेत्र रद्द झालेगडचिरोली : २०१५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात तालुका मुख्यालयाच्या गावांना नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. यामुळे आरमोरी जिल्हा परिषद क्षेत्र रद्द करण्यात आले. मात्र अलिकडेच राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यात जि.प. क्षेत्राची संख्या ५१ राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एक क्षेत्र नेमके जिल्ह्याच्या कोणत्या भागात वाढणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. १ मे २०१५ ला गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, आरमोरी या १० नगर पंचायती निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे आरमोरी शहरापुरते मर्यादित असलेले एक जिल्हा परिषद क्षेत्र आपोआपच रद्द झाले. याशिवाय एक पंचायत समिती क्षेत्रही रद्द करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ५० वर आली आहे. मात्र मागील महिन्यात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गडचिरोली जिल्ह्यात ५१ जिल्हा परिषद क्षेत्र पुढील निवडणुकीसाठी राहतील, असे सुतोवाच केले आहे. नगर पंचायतीमध्ये तालुका मुख्यालयाच्या गावाची व परिसरातल्या काही गावांची लोकसंख्या जोडून वार्ड तयार करण्यात आले होते. कोरची, भामरागड, मुलचेरा येथे लहान-लहान वार्ड यामुळे तयार झाले. नागरी भागात हा मतदार निघून गेल्याने आता जिल्हा परिषदसाठी ग्रामीण लोकसंख्येच्या आधारावर नव्या मतदार संघाचे पुनर्गठण करावे लागणार आहे. उत्तर गडचिरोली भागात देसाईगंज तालुक्यात लोकसंख्या वाढली. त्यामुळे या भागात एक मतदार संघ निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर दक्षिण गडचिरोली भागात मुलचेरा तालुक्यात लोकसंख्या वाढली असल्याने एक जिल्हा परिषद क्षेत्र नव्याने निर्माण होईल, अशी आशा काही राजकीय नेत्यांना आहे. एक जिल्हा परिषद क्षेत्र किमान १० हजार मतदारांचे असू शकते. त्यानुसार नेमक्या कोणत्या भागात नवे मतदार क्षेत्र निर्माण होईल, अशी शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
एक जि.प. मतदार क्षेत्र कुठे वाढणार
By admin | Published: September 11, 2016 1:37 AM