लोकमत न्यूज नेटवर्क, थिवी : राज्य सरकारतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी खास 'आस्था ट्रेन' सोडण्यात आली. गोवा ते अयोध्या असा थेट प्रवासही रेल्वे करत असून, सोमवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला आहे. १ हजार ४७० प्रवाशांना घेऊन ही रेल्वे निघाली आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार केदार नाईक, प्रवीण आर्लेकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. ही रेल्वे बुधवारी रात्री अयोध्येत पोहोचणार आहे. गुरुवारी गोमंतकीय भाविक श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. शुक्रवारी पुन्हा ही रेल्वे परतीचा प्रवास सुरू करणार आहे. रविवारपर्यंत भाविक दाखल होणार आहेत. अयोध्येत या भाविकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे.
सध्या जे भाविक श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेले आहेत. त्यापैकी अनेकांनी आपल्या खिशातील थोडेफार पैसे खर्च केल्याचे समजते. अनेकांकडून दीड हजार रुपये घेण्यात आले आहे, तर काहीजण आमदार व आपल्या स्थानिक नेत्यांच्या मदतीने मोफत अयोध्येसाठी रवाना झाले असल्याची माहितीसमोर आली आहे. सध्या जे भाविक अयोध्येत दर्शनसाठी गेले आहेत, ते राज्यात पुन्हा आल्यानंतर इतर भाविकांना घेऊन आणखी एक आस्था ट्रेन दि. २६ फेब्रुवारी रोजी अयोध्येसाठी रवाना होणार आहेत, अशी चर्चा सध्या भाविकांमध्येच आहे.
जय श्रीरामांच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय
आस्था ट्रेनमध्ये गोमंतकीय भाविकांनी 'जय श्रीराम, जय राम श्रीराम' अशा घोषणा देत वातावरण भक्त्तिमय केले. अनेकांनी भगवे ध्वज, मफलर घेऊनच प्रवास केला. अनेकजण गजर, भजन म्हणत रेल्वेत फिरत होते. महाराष्ट्रातील रोहा रेल्वे स्थानकांवर रेल्वे थांबली असता, भाविकांनी स्थानकावर उतरून रघुपती राघव राजाराम भजन म्हणत रिंगण घातले.