पणजी : येत्या दि. २५ पासून सुरू होत असलेले विधानसभा अधिवेशन हे फक्त चार दिवसांचे असले तरी, या चार दिवसांत एकूण दहा विधेयके सादर केली जाणार आहेत. सहा सरकारी विधेयके व चार खासगी विधेयके सादर होणार आहे. सरकारी पातळीवरून अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांचे अभिभाषण होणार आहे. विद्यमान राज्यपाल प्रथमच २५ रोजी सभागृहात प्रवेश करतील. यापूर्वी कोशयारी यांना कधी गोवा विधानसभेच्या सभागृहात अभिभाषण करण्याची संधी मिळाली नव्हती.
सभापती राजेश पाटणेकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार सरकार सहा विधेयके सादर करील. ही संख्या वाढूही शकते. गोवा लोकायुक्त कायदा दुरुस्ती विधेयक, गोवा बायोडीग्रेडेबल वेस्ट मेनेजमेन्ट, गोवा आर्थिक व्यवस्थापन, गोवा पालिका कायदा दुरुस्ती व अन्य विधेयके सादर होतील. सत्ताधारी व विरोधी आमदारांनी मिळून एकूण ७५१ प्रश्न सादर केले आहेत. यापैकी ५५६ प्रश्न हे अतारांकित आहेत तर १९५ प्रश्न तारांकित स्वरुपाचे आहेत. पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर काही दुखवट्याचे ठराव घेतले जातील. अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर मांडली जाईल. त्यावर पहिल्या दिवशी चर्चा मात्र होणार नाही. चर्चा दि. २७ ते दि. २९ असे तीन दिवस होणार आहे. या शिवाय तीन दिवस पुरवणी मागण्या मांडून संमत केल्या जातील.
शुक्रवारी खासगी कामकाजाचा दिवस आहे. त्या दिवशी आमदारांकडून पाच खासगी ठराव मांडले जाणार आहेत. विविध विषयांबाबतचे हे ठराव आहेत. दरम्यान, कोविड संकट काळात अधिवेशन चारच दिवस असल्याने विधानसभा प्रकल्पात जास्त लोकांना प्रवेश मिळणार नाही, असे सुत्रांनी सांगितले. सध्या विधानसभा प्रकल्प परिसरात स्वच्छता करणे व अन्य काम सुरू आहे. दरम्यान, सभापती पाटणेकर यांच्यासमोर सध्या तेरा आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका आहे. याचिकांविषयी काही निर्णय झाला आहे काय असे पत्रकारांनी विचारले असता, याचिकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आपण काही निर्णय घेतलेला नाही, असे पाटणेकर यांनी स्पष्ट केले.