लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा मुक्तिलढ्यात धारातीर्थी पडलेल्या १४ हुतात्म्यांच्या पहिल्या पिढीतील वारसदारांना सरकारतर्फे १० लाख रुपये व गौरवपत्र प्रदान करून सन्मानित केले जाईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी वीरगती प्राप्त केलेल्या या हुतात्म्यांची पत्नी, मुले आदी पहिल्या पिढीतील कायदेशीर वारसदारांची निवड करण्यात आली आहे. एकूण १५ हुतात्म्यांची निवड सरकारने केली होती; परंतु यांपैकी एकाकडून कायदेशीर वारसदार सिद्ध करणारे दस्तऐवज न मिळाल्याने १४ हुतात्म्यांच्या मुलांना गौरविले जाईल. हा कार्यक्रम मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला १८ रोजी पर्वरी येथे मंत्रालयाच्या सभागृहात होईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे कधीही विस्मरण होणे शक्य नाहीत. हुतात्मा ठरलेले कर्नल बेनिपाल सिंग यांच्या वीरपत्नीची गेल्या वर्षी हरयाणात आपण भेट घेतली होती व तिला सन्मानित केले होते', असे मुख्यमंत्री म्हणाले.
हुतात्मा बाळा राया मापारी, कर्नल बेनिपाल सिंग, बसवराज उदगी, शेषनाथ वाडीकर, तुळशीराम हिरवे (हिरवे गुरुजी), सखाराम यशवंत शिरोडकर, रोहिदास मापारी, यशवंत आगरवाडेकर, रामचंद्र नेवगी, बाबू गावस, बाळा धोंडो परब, लक्ष्मण नारायण वेलिंगकर, केशव सदाशिव टेंगसे, परशुराम आचार्य व बाबूराव केशव थोरात यांच्या वारसदारांना गौरवले जाईल.
स्वातंत्र्यसैनिकांची ४० मुले अजून सरकारी नोकऱ्यांपासून वंचित
दरम्यान, स्वातंत्र्यसैनिकांची ४० मुले अजून सरकारी नोकऱ्यांपासून वंचित आहेत. त्यांना लवकरच नोकऱ्या देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले. सावंत म्हणाले की, आम्ही नोकऱ्यांबाबत धोरणात स्पष्टता आणली. त्यामुळे सर्वांना नोकऱ्या मिळतील. स्वातंत्र्य सैनिकांच्या वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मुलांनाही आम्ही नोकऱ्या दिल्या. पूर्वी धोरण स्पष्ट नव्हते. त्यामुळे काहीजण वंचित राहिले, काही घरांत तीन-तीन नोकऱ्या दिल्या गेल्या.'