पणजी: देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील डॉक्टरांवर अधिक ताण असल्याचे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. डॉक्टर तणावाखाली काम करण्याचे प्रमाण देशात १० टक्के आहे. मात्र, गोव्यात ते १२ टक्के आहे. गोव्यातील तब्बल ४२ टक्के डॉक्टरांना नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा विभागाने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.
सर्वेक्षणानुसार, गोव्यातील १२ टक्के डॉक्टर हे तणावाच्या स्थितीत काम करीत आहेत. तणावाची जी कारणे सांगण्यात आली, त्यात सर्वात अधिक आहे ते म्हणजे रुग्णांच्या अपेक्षा. कामाच्या दीर्घ वेळा, फोनवर सततची उपलब्धता, काम आणि घरात असंतुलन, प्रशासकीय कामांचा बोजा अशीही काही कारणे आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनचा गोवा विभाग (आयएमए), गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी संशोधकांची टीम, सांगात संस्था आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने हे सर्वेक्षण केले आहे. दारुचे व्यसन जडलेल्यांना दारू सोडण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देत असतात. परंतु, खुद्द डॉक्टरच दारूच्या व्यसनात अडकले आहेत, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
आत्महत्येचाही धोका
सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत नैराश्य आणि चिंता अधिक असल्याने डॉक्टरांनी आत्महत्या करून मरण्याचा धोका जास्त असतो, असे डॉक्टरांनी सांगितले. हे गोव्यातील डॉक्टरांचे पहिलेच असे सर्वेक्षण होते.