लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील युवकांना कंत्राटी व खासगी कंपन्यांमधील नोकऱ्या नको. त्यांना सरकारी नोकऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपलब्ध करून देतील. दहा हजार नोकऱ्या तयार होतील. पाच ते सात हजार नोकऱ्या आरोग्य क्षेत्रात आम्ही निर्माण करू, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी जाहीर केले.
कुंभारजुवे मतदारसंघातील खोर्ली येथे आरोग्य खात्यातर्फे आयोजित मेगा आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. आयडा दे आतायएड व अन्य उपस्थित होते. यावेळी दिवाडी बेटावर १० खाटांची क्षमता असलेले सुसज्ज इस्पितळ उभारले जाईल. जागा निश्चित होताच ते उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणाही आरोग्य मंत्र्यांनी केली. ते म्हणाले, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी व अन्य सुविधा नाहीत. त्यांची पूर्तता केली जाईल. गोमंतकीय जनतेच्या भोवती आरोग्याचे कवच असावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
मंत्री राणे म्हणाले की, 'आरोग्यसेवा जनतेच्या दारी पोहोचावी, यासाठी आपली ठोस पावले उवलत आहोत. जे आपल्या जीवनात घडले ते दुसऱ्यांच्या जीवनात घडू नये, यासाठी प्रयत्न आहे. बांबोळी येथे लवकरच ३५० कोटी रुपये खर्च करून कर्करोग इस्पितळ उभारले जात आहे. गोमेकॉ इस्पितळही सुसज्ज करण्याचे प्रयत्न आहेत. रुग्णवाहिकांची संख्याही वाढवली जाईल.
जुने गोवे, खोर्ली येथील नागरिकांना चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात, या हेतूने खोर्ली आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवल्या जाणार आहेत. आरोग्यसेवा जनतेच्या दारात पोहोचाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. - विश्वजित राणे
१० खाटांचे इस्पितळ
मंत्री राणे म्हणाले, 'कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी मागणी केल्यानुसार दिवाडी बेटावर १० खाटांची क्षमता असलेले सुसज्ज इस्पितळ उभारले जाईल. येथील लोकांना आरोग्यसेवेबाबत कुठलीही अडचण येणार नाही. जागा निश्चित होताच, त्यासाठीची प्रक्रिया सुरू करू. निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया होईल,' असे मंत्री राणे यांनी सांगितले.