पणजी : गोवा विद्यापीठाला केंद्राकडून प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे विद्यापीठाचा दर्जा आता वाढणार असून बहु-अनुशासनात्मक शिक्षण आणि संशोधन विद्यापीठ म्हणून ते ओळखले जाईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून २०२० च्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शैक्षणिक, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम वाढवण्याची गोवा विद्यापीठाची क्षमता निश्चितपणे बळकट करेल, असे म्हटले आहे.
केंद्र सरकारने राज्यस्तरावर उच्च शिक्षणाच्या नियोजित विकासाद्वारे गुणवत्ता सुधारण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. देशभरातील ३०० पेक्षा जास्त राज्य विद्यापीठे आणि त्यांच्या महाविद्यालयांसोबत काम करण्याचे उद्दिष्ट आहे .नवीन शैक्षणिक संस्था निर्माण करणे, विद्यमान विस्तार आणि सुधारणा, दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी असलेल्या, व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेल्या आणि संशोधनाकडे अधिक कल असलेल्या संस्था विकसित करणे, उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे हा उद्देश आहे.
पात्र राज्य उच्च शैक्षणिक संस्थांना त्यासाठी वरील अभियान अंतर्गत केंद्राकडून निधी दिला जातो. राज्यांना अर्थसहाय्य राज्य उच्च शिक्षण योजनांच्या मूल्यांकनाच्या आधारावर दिले जाते. रोजगारक्षम आणि स्पर्धात्मक पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारक तयार करण्यासाठी गुणवत्तेवर अधिक भर दिला जातो. देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील सर्वोत्तम पद्धतींवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हे अभियान उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञान आणि मुक्त दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देते. 'नॅक' मान्यता श्रेणी सुधारण्यासाठी आणि दर्जेदार उपक्रम राबविण्यासाठी संस्थांना समर्थन मिळते.