पणजी: राज्यात हंगामी पावसाचे शतक पूर्ण झाले आहे. राज्यात १०० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात २० दिवसांत विक्रमी ६३ इंच पाऊस झाला आहे. आतापर्यंत ५७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंद करण्यात आला आहे. राज्यात हवामान खात्याने पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे.
राज्यात १ जून ते २० जुलै पर्यंत १०० इंच पावसाची झाली आहे. जूनमध्ये ३७ इंच पाऊस झाला तर जुलैमध्ये ६३ इंच पाऊस झाला आहे. यंदा जुलै संपूर्ण महिनाभर मुसळधार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस जुलै महिन्यात झाला आहे. राज्यात आतापर्यंत वाळपई, साखळी, पेडणे, फोंडा, काणकोण, सांगे या केंद्रात पावसाचे शतक पूर्ण झाले आहे. वाळपईत सर्वाधिक जास्त म्हणजे ११५ इंच पाऊस झाला आहे.
: पडझड आणि नुकसान
राज्यात हा महिनाभर मुसळधार पाऊस सुरु असून राज्यात माेठ्या प्रमाणात मातीच्या घरांची पडझड झाली आहे. तसेच १ हजाराहून अधिक झाडे पडण्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. यंदा मोठ्या प्रमाणत शेताची नाशाडी झाली. शेतकऱ्यांनी भात बियाणांच्या केलेल्या शेतात पावसाच्या पुराचे पाणी घुसले. त्याचप्रमाणे या पावसाने अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांचे आर्थिक नुकसान झाले. तसेच आतापर्यंत पाच जणांचा बळीही यंदाच्या पावसात गेला आहे.