लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा २६.६४ टक्के इतका विक्रमी लागला. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील १८७ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
पर्वरी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयातील परिषद सभागृहात काल मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव भारत चोपडे, सहायक सचिव शीतल कदम उपस्थित होत्या.शेट्ये म्हणाले की, मुलांपेक्षा मोठया संख्येने उत्तीर्ण टक्केवारीची परंपरा यंदाही मुलींनी कायम राखली आहे. मुलींचे प्रमाण ९६.९२ टक्के तर २६.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यंदा ४२८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. यंदा दहावीच्या परीक्षा या दोन सत्रात घेण्यात आल्या होत्या.
सरकारी विद्यालये चमकली
- एकूण ३९८ विद्यालयांपैकी १८७ विद्यालयांचा निकाल हा १०० टक्के आला आहे.- त्यातही सरस कामगिरी बजावताना ७८ सरकारी विद्यालयांपैकी ४९ विद्यालयात १०० टक्के निकाल लागल्यामुळे ६३ टक्के उत्तीर्ण टक्केवारी ठरली आहे.- केवळ ४१ टक्के अनुदानित विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
मुख्यमंत्र्यांची कन्या पार्थिवीला ८७% गुण
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मुलगी पार्थिवी हिला दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळाले आहेत. पार्थिवी ही साखळी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयातील आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
'दीपेश' पास झाला
अवघ्या काही दिवसांपूर्वी केरी यथील नदीत बुडून मृत्यू झालेल्या दीपेश नामदेव गावस याला दहावीच्या परीक्षेत ६२ टक्के गुण मिळाले आहेत. केरी स. मा. विद्यालयात तो शिकत होता.
क्रीडा गुणांचा लाभ
७१५१ विद्यार्थ्यांना क्रीडागुण मिळाले आहेत. त्यातील १९७ विद्यार्थी म्हणजेच १.०२ टक्के विद्यार्थी हे क्रीडा गुणामुळेच उत्तीर्ण झाले आहेत.