किशोर कुबल/ पणजी
पणजी : बांबोळी येथे सरकारी मनोरुग्णालयासाठी १०५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेली ५०० खाटांची सुसज्ज इमारत वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. क्यूबिक इन्फ्रा कंपनीकडे बांधकामाचे कंत्राट आहे. या इमारतीचे काम वेगाने सुरु आहे. ९६,००० चौ. मी. जमिनीत हे बांधकाम चालू असून ही नवीन इमारत झाल्यानंतर मनोरुग्णांवर अद्ययावत उपचारांची सोय होईल. हे नवे इस्पितळ जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल जिथे लोकांना विशेष उपचारांचा वापर करून प्रमाणित समुपदेशकांच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. सध्या, क्यूबिक इन्फ्राकडून रिसर्च अँड डेव्हलपमेंट ब्लॉकपासून किचन ब्लॉकपर्यंत एकूण तीन संरचना बांधण्याचे काम चालू आहे.
एका अहवालानुसार, गोव्यात दररोज सुमारे ४० ते ५० मनोविकाराची प्रकरणे नोंद होतात. विशेषत: नैराश्य, चिंता आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीशीही ही प्रकरणे संबंधित आहेत. क्यूबिक इन्फ्राचे सीईओ निखिल जैन म्हणाले की, ‘ गोवा सरकार पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहेत. वरील प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून नवीन वर्षात प्रारंभीच रुग्णांसाठी खुला होऊ शकतो. ५०० खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय रुग्णांना घरासारखे वाटावे या पध्दतीने बांधले जात आहे. क्यूबिक इन्फ्राने राज्यात दहा प्रकल्पांची कामे पूर्ण केली आहेत.
जागतिक बँकेने प्रायोजित केलेला राजधानी शहरातील जॉगर्स पार्क आणि आपत्ती व्यवस्थापन निवारा प्रकल्प यांचा यात समावेश आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम आणि डिचोली अग्निशामक दलाच्या इमारतीचे कामही ही कंपनी करत आहे. जून २०२२ मध्ये कंपनीला बांधकामाचे कंत्राट मिळाले व ते पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी देण्यात आला.