पणजी : वीज खात्यात अलिकडेच झालेली कनिष्ठ अभियंत्यांची भरती गाजत असली तरी, त्या भरतीविषयी बुधवारी प्रथमच वीज मंत्री निलेश काब्राल हे जाहीरपणो बोलले. माझ्या मतदारसंघातील 11 उमेदवारांची वीज खात्यातील भरतीवेळी निवड झाली. माझ्या मतदारसंघातील उमेदवार जर हुशार असतील व ते परीक्षा उत्तीर्ण होत असतील तर त्यात माझा दोष नाही, असे काब्राल यांनी नमूद केले.
काब्राल यांनी येथे मिलिंद नाईक यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. नाईक हे माजी वीजमंत्री व विद्यमान नगर विकास मंत्री आहेत. काब्राल म्हणाले, की वीज खात्यातील कनिष्ठ अभियंते भरती परीक्षेला कुडचडेतील एकूण 41 उमेदवार बसले होते. त्यापैकी 11 उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यात माझा काही हात नाही. उमेदवारांची सगळी नावे सरकारी वेबसाईटवर आम्ही टाकली होती.
काब्राल म्हणाले, की मिलिंद नाईक जेव्हा वीजमंत्री होते तेव्हा माझ्या मतदारसंघातील नऊ उमेदवारांची निवड झाली होती. माझ्या मतदारसंघातील उमेदवारांची जर अशा प्रकारे निवड होत असेल तर मी काय करू, त्यात माझा काही दोष असण्याचा प्रश्नच येत नाही. मंत्रिमंडळ बैठकीत वीज खात्यातील भरतीवरून चर्चा झाली होती काय, असे पत्रकारांनी विचारताच, एका ऑडिओ क्लीपमध्ये जसे बोलले गेले आहे, तशा प्रकारे चर्चा मात्र झाली नव्हती. अलिकडे क्लीपमध्ये कुणी कुणाचाही आवाज काढून बदनामी करत असतात. सोशल मिडियाचा गैरवापर थांबवण्यासाठीच केंद्र सरकार नवा कायदा करू पाहत आहे. उद्या जर कुणी माझा आवाज काढून एखादी खोटी क्लीप तयार केली तर मी लगेच पोलिसांकडे माझा मोबाईल स्वाधीन करून चौकशी करून घेईन.