पणजी : सोमवारी पावसाच्या हलक्या व मोठ्या सरी दिवसभर राज्यात कोसळल्या असल्या, तरी मान्सून अद्याप गोव्यात पोहोचलेला नाही. मंगळवारी किंवा बुधवारी मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. दिवसभरात राज्यात पावसाची नोंद झाली. पेडणे, साखळी, डिचोली, म्हापसा, वाळपई, पणजी, जुने गोवे, वास्को, कुठ्ठाळी, मडगाव, फोंडा, काणकोण, केपे आणि सांगेतही पाऊस कोसळल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली. वारा, विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट वगैरे काहीच नसताना दिवसभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत होता. रात्रीही तो सर्वत्र बरसला. हवामान खात्याच्या भाकितानुसार पुढील दोन दिवस पावसाचेच आहेत. आतापर्यंत एकूण ११ इंच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार काणकोण, केपे, मुरगाव, मडगाव, दाबोळी, पणजी, साखळी आणि पेडणेत अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. ११ इंच पावसाची नोंद होऊनही अद्याप मान्सून गोव्यात पोहोचला नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सूनच्या प्रभावामुळे गोव्यात पाऊस पडत असला, तरी मान्सून अचानक खालावल्यामुळे कारवारमध्येच खोळंबला आहे. (प्रतिनिधी)
११ इंच पाऊस!
By admin | Published: June 14, 2016 2:51 AM