मडगाव - बसमध्ये चढलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा मडगावात विनयभंग केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने बसचालक आल्वारो फुर्तादो याला दोषी ठरवून 1.10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय पीडीत मुलीला 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश बाल न्यायालयाच्या अध्यक्ष विजया आम्रे यांनी दिला आहे.
सदर घटना सहा वर्षांपूर्वी मडगावात घडली होती. 13 डिसेंबर 2013 रोजी सदर विद्यार्थिनी बसमध्ये असताना बसचालक आल्वारो याने तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. 21 डिसेंबरपर्यंत तो कोठडीत होता. हे कोठडीतले 9 दिवस न्यायालयाने कारावासाची शिक्षा म्हणून जमा केले. या प्रकरणात विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने मडगाव पोलिसात तक्रार केली होती.
मडगाव पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित उमर्ये यांनी या प्रकरणात तपास करुन बाल न्यायालयात आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. एकूण 11 साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर पेश करुन आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.