पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संकटात आलेल्या राज्यातील तीन हजार दोनशे बार आणि दारू दुकानांपैकी एक हजार शंभर बार व दारू दुकाने सध्याच्या स्थितीत वाचवली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मद्य विक्रेते संघटनेला शनिवारी दिले. दोनशे वीस मीटरची सवलत गोव्यालाही लागू होत असल्याचा सरकारचा दावा आहे. काही महामार्ग फेरअधिसूचित करणे आणि बार व दारू दुकाने या अंतराच्या बाहेर हटविण्यासाठी विना सोपस्कार दाखले देणे, असे पर्यायही मुख्यमंत्र्यांनी संघटनेपुढे ठेवले आहेत. संघटनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुख्यमंत्र्यांची आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तूर्त संघटनेचे तीस टक्के समाधान केले असून राहिलेले सत्तर टक्के समाधानही ते करणार असल्याचा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केला. एक हजार शंभर बार व दारू दुकाने सध्याच्या स्थितीत पाडावी किंवा हटवावी लागणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
१,११० बारना दिलासा
By admin | Published: April 02, 2017 2:21 AM