वासुदेव पागी, पणजी: गोव्यात कोट्यवधींची उलाढाल करणारा कॅसिनो असलेल्या डेल्टा कॉर्पोरेशनला बंगळूर जीएसटी आयुक्तांनी १११३९.६१ कोटी रुपये जीएसटी थकबाकीची नोटीस बजावली आहे. या कंपनीची एकूण जीएसटी थकबाकी १६८२२ कोटी रुपये इतकी प्रचंढ आहे.
डेल्टा कॉर्पोरेशनला १११३९.६१ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावण्यात आली असून दुसरी नोटीस, ५६८२ कोटी रुपयांची या कंपनीच्या तीन उपकंपन्यांना बजावण्यात आली आहे. कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा प्लेजर क्रूझ या त्या कंपन्या आहेत. या पैकी डेल्टा प्लेजर क्रूझ ही गोव्यात पर्वरी येथे आहे. या कंपनीचा मांडवीत ऑफशोर कॅसिनोही आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२२ पर्यंतची जीएसटी थकबाकीची ही रक्कम आहे. कंपनीकडून ही रक्कम फेडली नाही तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. कंपनीने याची कबुली आपल्या वार्षिक आर्थिक अहवालातही दिली आहे.
मात्र डेल्टा कॉर्पने आपल्या बचावार्थ जीएसटी संचालनालयाने लादलेली जीएसटी आणि बजावण्यात आलेली नोटीसही मनमानी स्वरूपाची आहे असे म्हटले आहे. लागु करण्यात आलेला कर आणि बजावण्यात आलेली नोटीस दोन्हीही बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नोटीसीच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत असे कंपनीने म्हटले आहे.शेअर्स गडगडले.
दरम्यान डेल्टा कॉर्पला बजावण्यात आलेल्या १११३९.६१ कोटींच्या नोटीसीचा अपेक्षित परिणामही शेअर बाजारावर झाला. कंपनीचे शेअर्स विकण्याची एकच झुंबड उडाली आणि मुंबई शेअर एक्सचेंचच्या नोंदीनुसार डेल्टाकॉर्पचे शेअर्स ०.०२९ टक्क्यांनी घसरून १७५.२५ रुपयांवर बंद झाले. सोमवारी शेअर मार्केट खुला झाल्यानंतरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यत्त केली जात आहे.