लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव: रिव्होल्यूशनरी गोवन्स अर्थात आरजी पक्षाच्यावतीने काढण्यात येत असलेल्या म्हादई जनजागृती पदयात्रेला सत्तरी तालुक्यामधील सर्व बाराही पंचायतींचे सरपंच व वाळपई नगरपालिकेने विरोध दर्शवला. त्याबाबतचे निवेदन सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आले. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजता पदयात्रेस परवानगीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी झाली. मात्र यावरील निवाडा अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे म्हादईबाबतच्या आरजीच्या जनजागृती पदयात्रेबाबत संभ्रम कायम आहे.
रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी शनिवारी पक्षाच्यावतीने म्हादईप्रश्नी नऊ दिवसांची पदयात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. रितसर परवानगी न घेतल्याच्या मुद्यावरून पोलीस आणि उप जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे येथील मैदानावरच पदयात्रा अडवली. मात्र, नंतर पदयात्रेस परवानगी देण्यात आली. तेथून पदयात्रा कोपार्डे येथे पुन्हा रात्री अडवण्यात आली होती. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता.
आज, मंगळवारी नाट्यमय घडामोडींमध्ये पदयात्रेस सत्तरीतील बारा गावांनी विरोध दर्शवला. त्याविषयची निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तर याबाबतची सुनावणी होऊन रात्री उशीरापर्यंत निर्णय जाहीर झाला नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"