लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : प्रदीर्घ भरती प्रक्रियेतून निवडलेल्या १२५ शिक्षकांना या आठवड्यात नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. निवडणूक आचारसंहिता जारी होण्यापूर्वी नियुक्तीपत्रे न दिल्यास प्रक्रिया पुन्हा रखडण्याची तसेच विद्यार्थ्यांना शिक्षक मिळण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या शिक्षक भरतीसाठी तब्बल ३ वर्षे प्रक्रिया चालली होती. तीनवेळा निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे त्यात खंडही पडला होता. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करून शिक्षण खात्याने गुणवत्ता यादीनुसार आणि राखिवता निकषांनुसार यशस्वी उमेदवारांना इच्छापत्रेही पाठविली होती. तसेच निवडण्यात आलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही झाली आहे. परंतु त्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे नियुक्तीपत्रे देण्यात आली नव्हती. आर्थिक दृष्ट्या मागास गटातील राखिवतेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडली होती.
दरम्यान, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, निवडण्यात आलेल्या उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. नियुक्तीनंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.