मडगाव - महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षा या दोन्ही बाबतीत गोवा हे आघाडीवर असलेले राज्य समजले गेले असले तरीही या राज्यात 13 टक्के महिलांना नव-याकडून होणा-या छळाला सामोरे जावे लागत असून यातील 15 टक्के स्त्रिया शहरी भागातील तर 9 टक्के स्त्रिया ग्रामीण भागातील असल्याचे राष्ट्रीय सर्वेक्षणातून पुढे आले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे -4 च्या अंतर्गत 15 ते 49 वयो मर्यादेतील महिलांचे सबलीकरण आणि अत्याचार या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष पुढे आले असून गोव्यातील 13 टक्के महिलांपैकी 12 टक्के महिलांवर पतीकडून शारीरिक अत्याचार झालेले आहेत. तर एक टक्का महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र यातील काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे 2005-06 वर्षाच्या तुलनेत 2015-16 या कालावधीत घरगुती अत्याचाराचे प्रमाण 4 टक्क्यांनी कमी झाले आहे.
ज्या महिलांवर शारीरिक अत्याचार झाले आहेत त्यातील 11 टक्के महिलांच्या पतींनी त्यांच्या थोबाडीत मारले आहे. तर 2 ते 3 टक्के महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाली आहे. तर एक टक्क्यांहून कमी महिलांवर सुरीचा व बंदुकीचा धाक दाखवून पतीकडून मारहाण झाली आहे. एक टक्का महिलांवर त्यांच्या पतीकडून जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. तर 1.6 टक्के विवाहित महिलांवर त्यांच्या गरोदरपणाच्यावेळी मारहाणीसारखे प्रकार घडले आहेत असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
2005-06 च्या तुलनेत 2015-16 या कालावधीत घरगुती अत्याचाराचे प्रमाण 4 टक्क्यांनी कमी झाले आहे. पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो मागच्या दोन वर्षात महिलांकडून घरगुती छळाच्या तक्रारी कमी येऊ लागल्या आहेत. मात्र यातीलही मेख अशी की, घरगुती अत्याचार प्रकरणात पतीला किंवा पतीच्या कुटुंबीयांना अटक करणे आता कायद्यानुसार अनिवार्य नाही. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर या तक्रारी नोंद होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.