वासुदेव पागी, पणजी: केंद्र सरकारने ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत केल्यामुळे महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या हे विधेयक कायदा बनल्यावर त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत १३ जागा या महिलांसाठी आरक्षित केल्या जातील असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. महिला आरक्षण विधेयकाचा मुद्दा जो कित्ये वर्षे रखडला होता. हे विधेयक मंजुर करण्याचे धाडस कुणी केले नव्हते ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे लोकशाही प्रक्रियेत महिलांचा फार मोठा समावेश होणार आहे. गोवा विधानसभेतही जवळ जवळ १३ जागा या महिलांसाठी आरक्षित केल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी कर्नाटकातील जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाशी भाजपच्या युतीमुळे समाधान व्यक्त केले आहे. जेडीएस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सामील होणे म्हणजे कर्नाटकात रालोआ शक्तीशाली होणे. याचे परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत दिसणार आहेत असेही ते म्हणाले. या युतीसाठीच्या वाटाघातीत आपण समन्वयकाची भुमिका बजावल्याचे ते म्हणाले.
चार राज्यांत होणार असलेल्या विधानसभा निवडणुकी विषयी बोलताना ते म्हणाले की या सर्व रा ज्यात भाजपचा विजय होणार आहे. त्याचे संकेतही मिळत आहेत. या दरम्यान छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यात प्रचार कामासाठी जाण्याचे भाग्य आपल्याला मिळाले. या प्रचार दौऱ्याच्या वेळी लोक मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे जाणवत होते, तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्तांतर होऊन भाजप सत्तेवर येण्याचे संकेत मिळत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.