पणजी - राज्यात एकूण 1 हजार 800 पोलिसांची संख्या कमी आहे. येत्या महिन्यात 1 हजार 300 पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात दिली जाईल, भरतीवेळी वयाची अटही थोडी शिथिल केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. महिला पोलीस उपनिरीक्षकांची जास्त गरज असून सगळी रिक्त पदे भरली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. मडगाव पोलीस स्थानकाला पोलिसांची संख्या कमी पडते. तिथे जे पोलीस मंजूर झाले आहेत, त्यापैकी 56 पोलीस हे अन्य डय़ुटीसाठी मडगाव पोलीस स्थानकापासून दूर असतात. ते पोलीस स्थानकावर असत नाहीत. मडगावला 32 पोलीस संख्येने कमी आहेत, असे कामत यांनी सांगितले. फातोर्डाला नवे पोलीस स्थानक सुरू झाल्यानंतर मडगावच्या पोलिसांची संख्या कमी झाली, असे उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले व मडगावसाठी निश्चितच ज्यादा पोलीस बळ पुरविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि, राज्यभर पोलिसांची संख्या कमी आहे. राज्यातील सर्व 28 पोलीस स्थानकांसाठी जेवढे पोलीस मंजूर झाले होते, त्यापेक्षा पोलिसांची संख्या कमीच आहे. यामुळेच पोलीस भरती लवकर केली जाईल. यापूर्वी प्रशिक्षणासाठी गेलेले 119 पोलीसही लवकरच सेवेत रुजू होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सर्व पोलीस स्थानकांसाठी एकूण 10 हजार 271 पोलीस मंजूर झाले होते. तथापि, फक्त 8 हजार 135 पोलीस आहेत. 1 हजार 800 पोलीस संख्येने कमी आहेत. अनेक पोलीस स्थानकांवर महिला पोलीस उपनिरीक्षकांची गरज आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक मिळतच नाहीत. यापूर्वी 72 महिला पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी सरकारने भरती प्रक्रिया सुरू केली होती. प्रत्यक्षात फक्त 32 महिला पोलिसांची भरती होऊ शकली. महिला पोलीस भरतीवेळी जास्त महिलांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.
पोलीस अधिकाऱ्याचे रेकॉर्डिग
काही महिला विनयभंगाच्या तक्रारी घेऊन गेल्यानंतर पोलीस स्थानकावर महिला पोलीस उपनिरीक्षक उपस्थित नसतात व पुरुष पोलीस उपनिरीक्षकाकडून महिलेला न्याय देण्याऐवजी तुझ्यावर बलात्कार झालेला नाही असा प्रश्न केला जातो, असे हळर्णकर यांनी सांगून आपल्याकडे त्याविषयी पोलिसाचे रेकॉर्डिगही असल्याचे हळर्णकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना हवे असेल तर आपण रेकॉर्डिग सादर करतो, असेही हळर्णकर म्हणाले.