पणजी : जैका प्रकल्पात कंत्राट मिळविण्यासाठी लाच देण्याचा ठपका ठेवलेल्या लुईस बर्जर कंपनीच्या१४ शेल कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कोलकाता येथे छापे टाकून त्या जप्त करण्यात आल्या. लाचेची रक्कम पोचविण्यासाठी या कंपन्या स्थापन केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासातून उघड झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत, आमदार चर्चिल आलेमाव यांच्या १ कोटी ९५ लाख रुपये किमतीच्या मालमत्ता जप्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असतानाच लुईस बर्जर या कंपनीच्या शेल कंपन्यांवरही छापासत्र सुरू केले आहे. कोलकाता येथील छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाने फार महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. शेल कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकले आहेत. या कंपन्यांच्या मदतीने लाचेची रक्कम पोचविली होती, असे तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात ठपका ठेवलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या मालमत्तेच्या जप्तीसंबंधी दोघांनाही नोटिसा बजावल्या आहेत. २00२च्या मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई केल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. या छाप्यांमुळे लुईस बर्जर कंपनीचे अधिकारी आणखी अडचणीत आले आहेत. (प्रतिनिधी)
कोलकात्यात १४ शेल कंपन्यांचा पर्दाफाश
By admin | Published: April 02, 2017 2:22 AM