लोकमत न्यूज नेटवर्क उसगाव : दक्षिण गोव्यात बुधवारी रात्री गुन्हे शाखेने सुमारे १२०० जिलेटिन कांड्यांचा समावेश असलेली १५० किलो स्फोटके आणि ३०० इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स असलेल्या सहा मोळ्या अवैधरीत्या वाहनातून वाहून नेणाऱ्या गुडेमळ सावर्डे येथील दोघांना अटक केली. संशयित भुजंग खटवकर (वय ३२) आणि तलक बाप्टिस्ट (वय ३५) अशी त्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या भरारी पथकाने धारबांदोडा येथे कारवाई केली. मारुती ओम्नी वाहनातून अवैधरीत्या स्फोटके वाहून नेताना आढळले होते. गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, भरारी पथकाने रात्री धारबांदोडा सावर्डे तिठ्यावर तपासणीसाठी मारुती ओम्नी वाहन (जीए ०९ डी ४२७८) अडवले. मोटारीतील दोन व्यक्तींकडे १५० किलो वजनाच्या १२०० जिलेटिन कांड्यांचे सहा बॉक्स आणि ३०० इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स असलेल्या सहा मोळ्या आढळून आल्या.
दोन्ही संशयितांना भारतीय दंड संहितेच्या कलम २८६ (स्फोटक पदार्थांबाबत निष्काळजी वर्तन) आणि स्फोटक पदार्थ कायदा कलम ५ अंतर्गत अटक करण्यात आली. चौकशीत संशयितांनी स्फोटके दगड खाणीच्या कामात वापरण्यासाठी वैध परवान्याशिवाय आणल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेच्या भरारी पथकाचे पोलिस निरीक्षक किशोर रामनन, सहायक उपनिरीक्षक विजयकुमार साळगावकर, सहायक उपनिरीक्षक संतोष गोवेणकर पोलिस शिपाई विशाल नाईक, राहुल नाईक, कल्पेश तोरसकर यांनी कारवाई केली. गुन्हे शाखेतर्फे पुढील तपास सुरू आहे.
स्फोटके कोठून आणले याचा शोध सुरु
दरम्यान, गुन्हे शाखेच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईनंतर सर्वत्र खळबळ उडाली. दगड खाणीच्या कामासाठी ही स्फोटके आणल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात जिलेटिन आणि डिटोनेटर्स आणली कोठून असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्याचा शोध लावण्याचे आव्हान आता गुन्हे शाखेसमोर आहे. या दृष्टिकोनातून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे असे सूत्रांनी सांगितले.