लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात येत्या दोन वर्षात १५० मेगावॉट विजेची निर्मिती केवळ सौर आणि पवन ऊर्जेवर केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. सीआयआयच्या अक्षय ऊर्जा २०२३ परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, की प्रतिवर्षी किमान ५०० नोकऱ्या केवळ सौर व पवन ऊर्जानिर्मितीतून तयार होणार आहेत. राज्यभर १०० मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील. पवन उर्जा प्रकल्पही सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले. गोवा सरकारने २०५० पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये १०० टक्के अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे १५ हजार अतिरिक्त रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छ अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रित करणारी सीआयआय गोवा परिषद, उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रांच्या व्यवसाय पद्धतींना शाश्वततेच्या दिशेने बदलण्याच्या उद्देशाच्या दिशेत कार्यरत आहे. परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीने उद्योगांना अद्ययावत तंत्रज्ञान, अभियांत्रिकी डिझाइन पद्धती तसेच स्वच्छ आणि हरित ऊर्जेची अंमलबजावणी व वापराशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा झाली.
या कार्यक्रमाला सीआयआय राज्य परिषदेच्या अध्यक्ष स्वाती साळगावकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सिन्हा, प्रदीपकुमार दास, अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"