समीर नाईक, पणजी: राज्यात २६ ऑक्टोबरपासून होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देशभरातील सुमारे १५६ खेळाडू मंगळवारी राज्यात दाखल झाले आहेत. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या खेळाडूंचे दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, गावडे यांच्यासोबत वास्कोचे आमदार कृष्णा साळकर हे, व क्रीडा खात्याचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जसे जसे वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचे सामने जवळ येत आहे, तसे तसे त्या त्या क्रीडा प्रकारात आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू राज्यात दाखल होणार आहे. सध्या जे खेळाडू आले आहेत, ते दाबोळी विमानतळ आणि मडगाव येथून रेल्वे मार्गे आले आहेत, असे गावडे यांनी यावेळी सांगितले. १९ रोजी बॅडमिंटन खेळापासून ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे सुरू होत आहे. त्यानंतर तलवारबाजी आणि व्हॉलीबॉल होईल, असेही गावडे यांनी यावेळी सांगितले.
कला आणि संस्कृती खात्या तर्फे खेळाडूंचे ढोल ताश्यांच्या गजरात आणि फुलांनी स्वागत करण्यात आहे, यापुढे देखील जे खेळाडू राज्यात दाखल होईल त्यांचेही असे स्वागत करण्यात येईल. या स्पर्धेच्या पार्श्वूमीवर महनीय व्यकी, तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक व इतरही राज्यात दाखल होणार आहे, असे गावडे म्हणाले.
२६ ऑक्टोबरपर्यंत फातोर्डा येथील नेहरू स्टेडियम उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज होणार असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित असतील, असे गावडे यांनी पुढे सांगितले. अंतिम टप्प्यातील काम, किरकोळ बदल इत्यादींसाठी आम्ही २ दिवसांचा मोकळा वेळ ठेवला आहे. कांपाल येथील क्रीडा नगरी २४ ऑक्टोबरपर्यंत तयार होणार आहे. आम्ही सगळ्या एजन्सींना, स्मार्ट सिटी, पीडब्ल्यूडी, मलनिस्सारण महामंडळ, जीएसआयडीसी यांनाही सूचना दिली आहे की २५ ऑक्टोबरपासून रस्ते खोदकामासारखी कामे स्थगित ठेवावी, असही त्यांनी सांगितले.
"आमचे अधिकारी अथकपणे पूर्णवेळ काम करत आहेत. आम्ही हे आयोजन सफलरीत्या व्हावे यासाठी अथक मेहनत घेत आहोत. सर्व सुरळीतपणे होण्यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही गावडे म्हणाले.