लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: लोकमतचा १५ वा वर्धापन दिन काल, शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, उद्योग, साहित्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षांव करण्यात आला.
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात स्नेहमेळावा झाला. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार डॉ. दिव्या राणे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आदी अनेकांनी स्नेहमेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या सोहळ्यात १२ वृत्तपत्र विक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मंत्री खंवटे म्हणाले की, आज इंटरनेटच्या युगात अनेकजण ऑनलाईन पद्धतीने वृत्तपत्र वाचत असले तरी वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारे वाचकही वाढत आहेत. 'लोकमत'ने आपले वेगळेपण जपल्यामुळेच आज अल्पावधीतच 'लोकमत' घराघरांत पोहोचला आहे. दरम्यान, स्नेहमेळाव्याला आमदार संकल्प आमोणकर, दत्ता खोलकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार महादेव नाईक, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर, एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर आदी उपस्थित होते.
'लोकमत'च विश्वासार्ह
१५ वर्षात गोव्याच्या पत्रकारिता क्षेत्रात 'लोकमत'ने मोठी कामगिरी बजावली आहे. बातमीदारी करताना 'लोकमत'ने नेहमीच आपले वेगळेपण आणि विश्वासार्हता जपली आहे, असे गौरवोद्गार खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काढले. 'लोकमत आणि गोवा' हे असे समीकरण बनले आहे की लोकमत वाचल्याशिवाय वृत्तपत्र वाचले असे वाटतच नाही, असेही ते म्हणाले.
'कुजबुज'चे कौतुक
वर्धापन सोहळ्यात 'लोकमत'च्या कामगिरीचे कौतुक करताना 'लोकमत'च्या 'कुजबुज' या सदराचा उल्लेख करण्यास कुणीच विसरले नाही. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सदानंद शेट तानावडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी 'कुजबुज'चे कौतुक केले.
विक्रेते भारावले...
'लोकमत'ने गोमंतकीयांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काल वर्धापनदिन सोहळ्ळ्यात घराघरांत वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या वृतपत्र विक्रेत्यांचा 'लोकमत'ने सन्मान केला. पडद्यामागच्या या 'हिरों'चा सन्मान करणारे 'लोकमत' पहिलेच वृत्तपत्र ठरले. यावेळी सोहळ्याला उपस्थित असणारे सन्मानमूर्ती विक्रेते भारावून गेले.