लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : गोव्यात मिरामार समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी अडकलेल्या कसिनो जहाजातून रविवारी दुपारी तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने १७ कर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यातील चार कर्मचारी जखमी झाले आहेत.वादग्रस्त ‘एमव्ही लकी सेव्हन’ हे कसिनो जहाज हार्बरहून मांडवी नदी आणले जात असताना जोरदार वारा व पावसामुळे भरकटून ते मिरामार किनाऱ्यापासून केवळ १00 मीटरवर वाळूच्या पट्ट्यात अडकले. परिणामी किनाऱ्यावर तेल गळतीचा धोका निर्माण झाला आहे. कसिनो जहाजावर १७ कर्मचारी होते. त्यापैकी चार दुर्घटनेत जखमी झाले. तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने त्यांची सुटका केली. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांच्या गोल्डन ग्लोब कंपनीचा हा कॅसिनो दोन टगच्या साहाय्याने मांडवीत आणला जाताना नदीच्या मुखावर निर्माण झालेल्या वाळूच्या पट्ट्यात अडकला. जोरदार वाऱ्यामुळे तो भरकटत असताना वायर रोपने नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले; परंतु ते फोल ठरले. मांडवीच्या मुखाजवळ पाण्याखाली वाळूचे बेट निर्माण झाले आहे. तेथेच हा कसिनो अडकला. बंदर खात्याने सहाव्या कॅसिनोला परवानगी नाकारली होती, तरीही सरकारने त्यास परवानगी दिली.
समुद्रात अडकलेल्या जहाजातून १७ जणांची सुटका!
By admin | Published: July 17, 2017 2:04 AM