मडगाव : ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्याचे प्रशासन सज्ज झाले असून या निवडणुकीत अडचणी येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी दक्षिण गोव्यातील १७३८ समाजकंटकांची यादी तयार केली आहे. बुधवारपासून आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यातील दारूच्या दुकानांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक व पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यात आली. यंदा प्रथमच दक्षिण गोव्याची मतमोजणी मडगावात एकाच ठिकाणी न घेता मडगाव, वास्को, केपे व फोंडा अशा चार ठिकाणी घेण्यात यावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणुकीच्या काळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी केंद्रीय राखीव दलाच्या ५0 ते ५३ तुकड्या गोव्यात आणल्या जातील, अशी माहिती अधीक्षक प्रभुदेसाई यांनी दिली. फोंडा तालुका आता दक्षिण गोव्यात समाविष्ट केल्याने एकूण २१ मतदारसंघांसाठी दक्षिण गोव्यातून मतदान होणार आहे. यासाठी ४४८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रांवर निवडणुकीच्या कामासाठी ४२४0 कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन अशी ४२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांचे काम सुरू झाले आहे. निवडणुकीच्या काळात विमानतळ, बंदर, आंतरराज्य प्रवेशद्वारे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी ११ टेहळणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासंदर्भात माहिती देणाऱ्या ५ व्हिडिओ फिल्म्स तयार करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सिनेमागृहातून या फिल्म दाखविल्या जाणार आहेत, असे स्वप्नील नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दक्षिणेत १७३८ समाजकंटक
By admin | Published: January 05, 2017 2:04 AM