मडगाव : मडगावपासून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या वास्कोतील मुरगाव बंदराच्या परिसरात 17व्या शतकातील दुर्मिळ असे सतीशिल्प सापडले असून पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात त्यामुळे अशाप्रकारच्या 11व्या शिल्पाची भर पडली आहे. आतापर्यत या संग्रहालयात दहाव्या ते सोळाव्या शतकार्पयतची अशाप्रकारे दहा शिल्पे मौजूद होती. आता त्यात 17व्या शतकाच्या शिल्पाचीही भर पडली आहे.
मुरगाव पोर्ट ट्रस्टचे सहाय्यक कन्झर्वेटर कॅप्टन मनोज जोशी यांना एमपीटी प्रशासकीय इमारतीच्या एका वापरात नसलेल्या बंगल्याच्या झाडीत हे शिल्प सापडले. याबद्दल जोशी यांनी सांगितले, या दगडाचा आकार पाहून सुरुवातीला मला तो मसाला वाटण्याचा पाटा वाटला. मात्र या दगडावर काहीतरी कोरलेले असल्यामुळे तो दुर्मिळ असावा असे वाटल्याने यासंबंधीची माहिती देण्यासाठी पुरातत्व खात्याशी संपर्क साधला.
पुरातत्व खात्याचे सहाय्यक अधीक्षक वरद सबनीस यांनी वास्कोला भेट देऊन या शिल्पाची पहाणी केली असता हे शिल्प किमान 300 ते 400 वर्षापूर्वीचे असल्याचे ते म्हणाले. गोव्यात पोतरुगीजांचे आगमन होण्यापूर्वी देशातील इतर भागांप्रमाणोच गोव्यातही सती जाण्याची प्रथा चालू होती. सती गेलेल्या महिलेची आठवण म्हणून त्या जागी असे कोरलेले शिल्प लावले जायचे. ज्याला स्थानिक भाषेत सतीची शिळा असे म्हणत असत. पुरातत्व खात्याकडे असलेल्या या पूर्वीच्या शिळा फोंडा, सत्तरी व केपे तालुक्यातून मिळाल्या होत्या.
या नवीन शिळेबद्दल बोलताना सबनीस म्हणाले, 17व्या शतकाच्या पूर्वी असलेल्या शिळावर वेगळ्या प्रकारचे कोरीव काम केले जायचे. 17व्या शतकानंतर हे काम बदलले. सध्या सापडलेल्या शिळेवर असलेले कोरीव काम 17व्या शतकानंतरचे आहे. हे शिल्प लोकांना पहाण्यासाठी पुरातत्व खात्याच्या पणजीतील संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.