मडगाव - कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागच्या दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील मुरगाव ते सासष्टी या किनारपट्टी भागात सहा मृत कासव सापडल्याने गोव्यातील कासवांचे स्थान धोक्यात आले की काय ही चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
दक्षिण गोव्यातील सासष्टी भागात झालोर (करमणो) ते फातड्रे (वार्का) या किनारपट्टी भागात केवळ 150 मीटरच्या अंतरात ऑलिव्ह रिडले जातीची तीन कासवे मरुन पडलेली दिसली. त्याशिवाय बेताळभाटी आणि माजोर्डा येथेही असे मृत कासव सापडले. मुरगावच्या जपनीस गार्डन या नावाने परिचित असलेल्या किनारपट्टीवरही एक मृत कासव सापडले. या घटनेची वनखात्याने गंभीर दखल घेतली असून या कासवांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला याची चौकशी चालू असल्याचे विभागीय वनअधिकारी सिद्धेश गावडे यांनी सांगितले.
राजबाग, कळंगूट, कांदोळी, बोगमाळो, वेळसाव आणि बेताळभाटी या किनारपट्टी भागात याआधी केवळ तीन दिवसांतच बारा मृत कासवे सापडली होती. यातील काही कासवे नुकतीच मेली होती तर काही कासवे बऱ्याच दिवसांपूर्वी वाहून आल्याचे दिसून आले होते.गोव्यातील कासव संवर्धन मोहिमेत भाग घेतलेल्या टेरा कॉन्स्क्युयसच्या पुजा मित्र यांनी या संबंधी बोलताना वाढते प्रदूषण आणि किनारपट्टीवरील प्लास्टीक आणि इतर कच:यात झालेली वाढ यामुळेच ही कासवे मरु लागली आहेत. ही गोष्ट चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या.
ज्या किनारपट्टी भागात कासवांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्या भागात मासेमारी प्रमाणोच जलक्रीडा प्रकार मोठय़ा प्रमाणावर आयोजित केले जातात. कासवे मरण्याचे हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. कित्येकवेळा जलक्रीडा प्रकारात ज्या हायस्पीड बोटी असतात त्यांना आपटून कासवे मरतात. कित्येकदा ती मासेमाऱ्यांच्या जाळ्यातही सापडतात मात्र मासेमारी या कासवांना जाळ्यातून सोडविण्यापेक्षा आपले जाळे फाटू नये यासाठी कासवाच्या पायाकडील भाग कापून त्यांना मोकळे करतात. अशी जखमी झालेली कासवे नंतर फार काळ जिवंत राहू शकत नाहीत अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सागरातील प्लास्टीकचे वाढते प्रमाण हेही कासवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरते अशी माहिती वन खात्याचे सहाय्यक वनपाल आनंद जाधव यांनी दिली. ते म्हणाले, पाण्यातील जेली फिश हे कासवाचे खाद्य असते. हे जेली फिश पाण्यावर तरंगत असताना कासवे त्यांना खातात. कित्येकदा पाण्यावर पडलेले प्लास्टीक कासवांना या जेली फिशसारखे दिसल्यामुळे हे प्लास्टीकही ते खातात. कित्येकदा हे प्लास्टीक त्यांच्या तोंडाला चिकटते. कित्येकदा त्यांच्या नाकात ते जाते त्यामुळे गुदमरुन कासवे मरतात. पाण्यात मरुन पडलेली ही कासवे नंतर दर्याच्या लाटाबरोबर किनारपट्टीवर येऊन पडतात अशी माहिती त्यांनी दिली.