वास्को: ‘फ्रेंडशिप डे’ सुरू होण्याच्या आधीच शांतीनगर, वास्को महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय संज्योत बोरकर याचा मृत्यू झाला असून त्याचे दोन मित्र जखमी झाले. संज्योतचा मित्र डेवीड क्रुज (वय २०) भरधाव वेगाने चारचाकी घेऊन दाबोळी विमानतळाच्या दिशेने जाताना त्याचा ‘स्टीअरिंग’ वरील ताबा सुटून चारचाकी रस्त्याबाहेर जाऊन वरून खाली कोसळली. त्या अपघातात डेवीड क्रुज आणि २४ वर्षीय सहर्ष भोसले गंभीर जखमी झाल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री ११.२० वाजता भीषण अपघात घडला. संज्योत बोरकर (रा: नोनमोन - वास्को), डेवीड क्रुज (रा: खारीवाडा - वास्को) आणि सहर्ष भोसले (रा: नोनमोन - वास्को) हे तिघेही चांगले मित्र आहेत. रात्री तिघेही चारचाकीने शांतीनगर महामार्गावरून दाबोळी विमानतळाच्या दिशेने जात होते. भरधाव वेगाने डेवीड शांतीनगर महामार्गावरून चारचाकी (क्र: जीए ०१ इ ६३९८) चालवत जाताना अचानक त्याचा ‘स्टीअरींग’ वरील ताबा सुटला. ताबा सुटल्यानंतर चारचाकी रस्त्याबाहेर जाऊन वरून खाली कोसळून तेथे असलेल्या घराजवळ थांबली.
अपघात एवढा भयंकर होता की चारचाकीचा चक्काचूर झाला. अपघात घडल्याचे तेथे राहणाऱ्यांना समजताच त्यांनी त्वरित तेथे येऊन चारचाकीत जखमी झालेल्या तिनही युवकांना बाहेर काढले. तसेच त्यांना उपचारासाठी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. अपघातामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर तेथून बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या तिनही युवकांना इस्पितळात नेले असता संज्योतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातात सापडलेल्या चारचाकी चालक डेवीड याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठवल्याची माहीती मिळाली.
अपघातात जखमी झालेला तिसरा मित्र सहर्ष हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू असल्याची माहीती पोलीसांनी दिली. अपघात एवढा भिषण होता की त्यात जखमी झालेल्या युवकांना बाहेर काढण्यासाठी चारचाकीचा दरवाजा तोडावा लागला अशी माहीती मिळाली. पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मरण पावलेल्या संज्योत च्या मृतदेहावर रविवारी (दि.४) शवचिकीत्सा केल्यानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातात सापडलेल्या त्या चारचाकीच्या काचा एकदम काळ्या (टींन्टड) होत्या अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
अपघातात मरण पावलेला १९ वर्षीय संज्योत एका ‘पेंन्ट’ दुकानावर कामाला होता अशी माहीती मिळाली. त्याला दोन भाऊ असून त्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटूंबिय, मित्र परिवारावर दु:ख्खाचा डोंगर कोसळला आहे. वास्को पोलीस त्या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.