म्हापसा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकर बंद झालेला पर्यटन व्यवसाय अद्यापपर्यंत पूर्णपणे सुरु झाला नाही. पर्यटकांअभावी किनारे ओस पडले आहेत. असे असले तरी ड्रग्स व्यवसायिकांनी ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी किनारी भागावर आपले लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्यास आरंभ केला आहे. मागील चार दिवसात उत्तर गोव्यातून दोघांना अटक करून त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या ड्रग्सवरून हे स्पष्ट होऊ लागले आहे.चार दिवसाच्या अंतरात पोलिसांनी २ किलो वजनाचे ड्रग्स दोघांकडून ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किमत सुमारे २ लाख रुपये आहे.ड्रग्स आणि पर्यटन असे समिकरण झालेल्या गोव्यातील पर्यटन व्यवसायावर कोरोनामुळे परिणाम झाले आहेत. पर्यटनाशी निगडीत सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. किनाºयाच्या आकर्षणामुळे येणारे पर्यटक अद्यापपर्यंत दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे किनारी भाग सूने सूने वाटत आहे. मंदावले व्यवसाय पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत. किनाऱ्यावर आकर्षण ठरणाऱ्या शॅक्सची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आलेल्या नाहीत. असे असून ड्रग्स व्यवसायिकांनी ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत.गेल्या आठवड्यात हणजुणा पोलिसांनी शिवोली येथे चरस बाळगल्या प्रकरणी शोयब अन्सारी या मूळ उत्तर प्रदेश येथील इसमाला रंगेहात ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा ७५ ग्राम चरस ताब्यात घेण्यात आला. तो ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती उपलब्ध होताच त्याच्यासाठी सापळा रचण्यात आला होता. निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमाराला कळंगुट पोलिसांनी मूळ राजस्थानातील एका व्यक्तीकडून सव्वा लाख रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेतला आहे. निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित ओमप्रकाश ताड याच्याकडून १ किलो २०० ग्राम वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. चार दिवसात २ किलो वजनाचा तसेच २ लाख रुपये किमतीचा ड्रग्स पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे.
पर्यटक नाही; ड्रग्स येऊ लागले गोव्यात; चार दिवसांत दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 7:43 PM