पणजी - बाणस्तारी अपघातात तिघांचा बळी घेणाऱ्या मर्सिडिज कारची मालकीण मेघना सिनाय सावर्डेकर हिला अपघातपीढीतांच्या वैद्यकीय खर्चासाटी २ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे. पोलीसांनी चौकशीसाठी हजर राहण्याच्या बजावलेल्या समन्सना मेघनाने खंडपीठात आव्हान दिले होते आणि ही याचिका बुधवारी सुनावणीस आली होती. यावेळी मेघनाच्या वकिलानी न्यायालयालयाला सांगितले की, अपघातग्रस्तांच्या वैद्यकीय खर्चासाठी २ कोटी रुपये देण्याची मेघनाची इच्छा आहे.
त्यावर खंडपीठाने २ आठवड्यात २ लाख रुपये रक्कम न्यायालयात जमा करण्यास सांगितली. बाणस्तरी अपघातात मृत्यू झालेल्यांना तसेच जखमींसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. मात्र, या रकमेचा मूळ भरपाईच्या रकमेवर जो निर्णय होईल त्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान मेघना हिची खंडपीठातील याचिका ही म्हार्दोळ पोलीसांच्या समन्सना आव्हान देणारी होती. म्हार्दोळ पोलिसांनी मेघनाला पोलीस स्थानकात उपस्थित राहण्याची तसेच वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र आता हे प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे गेल्यानंतर तिच्या याचिकेला किती महत्त्व राहिले आहे त्यावर न्यायालयच निर्णय घेणार आहे. कारण क्राईम ब्रँचने सूत्रे हाती घेतल्यावर मेघनाची आणि तिच्या मुलींचीही वैद्यकीय चाचणीही मंगळवारी झाली आहे.
बाणस्तरी येथे ६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघातात सुरेश फडते आणि भावना फडते या दिवाडी येथील दांपत्याचा आणि अरूप करमाकर या बांदोडा येथील युवकाचा मृत्यू झाला होता. तसेच फोंडा येथील वनिता भंडारी, बाणस्तरी येथील शंकर हळर्णकर आणि ताळगाव येथील राज माजगावकर हे गंभीर जखमी झाले होते.