किशोर कुबल/ पणजी
पणजी : बड्या तारांकित हॉटेल्ससह इतर ठिकाणी आदरातिथ्यासाठी सेवा क्षेत्रात पुढील पाच वर्षात गोव्यात २ लाख नोकय्रा निर्माण होतील. त्यामुळे सरकारने आयटीआय केद्रांमध्ये सुरु केलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन हा रोजगार गोमंतकीय तरुणांनी मिळावावा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
जागतिक कौशल्यदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कला अकादमी संकुलात हा कार्यक्रम झाला.आयटीआय केंद्रांमधील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. राज्यभरातील आठवी, नऊवीच्या हजारो विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम लाइव्ह पाहिला. ताज हॉटेल्सशी सरकारने समझोता करार केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि,‘ आयटीआयमध्ये सहा महिने थिएरी व ताज हॉटेलमध्ये सहा महिने प्रॅक्टीकल करावे लागेल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या ताज हॉटेल किंवा इतर बड्या हॉटेलांमध्ये शंभर टक्के नोकरी मिळू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम आहेत ते करावेत. सरकारने सर्व अकराही आयटीआय केंद्रांचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २२० कोटी रुपये खर्च केले जातील. टाटा समुहाकडून १७० कोटी रुपये मिळतील. ताज ग्रुपसारखे इतरांनी यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
५ टक्केच युवक सेवा क्षेत्रातमुख्यमंत्री म्हणाले कि, बड्या हॉटेलांना लागणारे मनुष्यबळ गोव्यात मिळत नाही. त्यामुळे परप्रांतीय नोकय्रा बळकावतात. तसे करु देऊ नका,गोव्याचे ५ टक्केच युवक सेवा क्षेत्रात येतात. पांढरपेशी नोकरी असूनही याकडे दुर्लक्ष केले जाते व सरकारी नोकरीचा आग्रह धरला जातो. तसे करु नये.’
सावंत म्हणाले की,‘ प्रत्येक हाताला कौशल्य देणे महत्त्वाचे. मोदींनी कौशल्य मंत्रालय सुरु केले. प्रधानमंत्री कौशल्य योजना आणली. पूर्वी स्थिती वेगळी होती. कुठेच प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी आयटीआयकडे येत असत. आता परिस्थिती बदलली आहे.राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांचेही याप्रसंगी भाषण झाले. टाटा, जग्वार, ताज हॉटेल, पुत्झमायझर व इतर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.