लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले भाडेकरू तपासणीचे काम उत्तर गोव्यात जोरात सुरू आहे. या मोहीमेंतर्गत ऑक्टोबर महिन्यातच ८९ हजार २१९ भाडेकरूंची तपासणी करण्यात आली आहे, तर जानेवारीपासून आतापर्यंत १ लाख ७२ हजार ६८५ भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली.
भाडेकरू पडताळणी मोहिमेने राज्यात जोर पकडला आहे. उत्तर गोव्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १ लाखाहून अधिक भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली आहे, तसेच ऑक्टोबर महिन्यात ५५,०२६ भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली असल्याची माहिती उत्तर गोव्याचे अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. दक्षिण गोव्यात आतापर्यंत १० महिन्यांत ७२ हजार ६७७ भाडेकरूंची तपासणी करण्यात आली आहे. तर, एका ऑक्टोबर महिन्यात ३४ हजार १९३ जणांची पडताळणी करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोव्याच्या अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संमत केलेला भाडेकरू पडताळणी कायदा राज्यात लागू झाला आहे. याअंतर्गत भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकास १० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. सरकारने याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जे घरमालक आपल्याकडे वास्तव्या करणाऱ्या भाडेकरूंची माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा थेट मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे सध्या या पडताळणी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
इथे सर्वाधिक भाडेकरू
राज्यात सर्वाधिक भाडेकरू हे वेर्णा, कळंगुट, पर्वरी, जुने गोवे आणि कोलवा भागात असल्याचे या पडताळणी दरम्यान समोर आले आहे. दक्षिण गोव्यातील वेर्णा पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात १० महिन्यांत १३,००३ भाडेकरू आढळून आले. तर, उत्तरेत केवळ एका ऑक्टोबर महिन्यातच कळंगुट भागात १२ हजार ७७७ तर पर्वरीत १०,५०० भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली. तसेच आतापर्यंत या दोन्ही भागांत अनुक्रमे १७,९८२ आणि १९,११४ भाडेकरूंची पडताळी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.