पणजी: सरकारी कार्यालयसोबतच सरकारी बैठका आणि शासकीय सोहळ्यांमध्ये पाण्याच्या प्लास्टीकच्या बाटल्या, बश्या आणि ग्लास आगामी 2 ऑक्टोबरपासून वापरायचे नाहीत असे बजाविणारे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी जारी केले आहे. सरकारी खात्यांच्या उपहारगृहांनाही (कॅण्टीन) हा बंदी आदेश लागू करण्यात येत आहे.
इको-फ्रेण्डली बश्या, बाटल्या व कप वापरावेत असे सरकारने बजावले आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मान्यता घेतल्यानंतर सर्वसाधारण प्रशासन खात्याच्या अव्वल सचिवांनी याबाबतचा आदेश जारी केला असून येत्या 2 रोजी गांधी जयंतीच्या दिवसापासून सरकार पूर्णपणो पर्यावरणासपूरक अशी भूमिका घेण्यास कटीबद्ध होत आहे.
सरकारी खात्यांच्या बैठकांवेळी पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टीक बाटल्या वापरल्या जात आहेत. तसेच सरकारी सरकारी कार्यालयांच्या सोहळ्य़ांवेळीही प्लॅस्टीक बाटल्यांचे पाणी दिले जाते. चहा देण्यासाठीही काहीवेळा प्लॅस्टीक ग्लास वापरले जातात. यापुढे अशा वस्तूंचा वापर करायचा नाही असे बजाविले गेले आहे. सरकारच्या प्रत्येक खात्याकडे कॅण्टीन आहे. अशा उपहारगृहांतही यापुढे प्लॅस्टीकच्या बाटल्या, ग्लास व प्लॅस्टीक बश्यांचा वापर करता येणार नाही.
बाजारपेठा व अन्यत्र यापूर्वीच सरकारने व पालिकांनी प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी लागू केली आहे. प्लॅस्टीक कुजत नसल्याने ते पर्यावरणास अतिशय हानीकारक ठरते. तरीही काही बाजारपेठांमध्ये बेकायदा पद्धतीने प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होतो. पणजी बाजारपेठेत यापूर्वी महापालिकेने प्लॅस्टीकविरोधी मोठी कारवाई मोहीम राबवली होती. यामुळे भाजी व फळ विक्रेत्यांनी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर पूर्णपणो थांबवला होता. आता हळूहळू काहीजणांनी छुप्या पद्धतीने हा वापर सुरू केला आहे. महापालिका त्याविरुद्ध पुन्हा कारवाई सुरू करण्याच्या विचारात आहे.