पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरुन गेल्या सोळा महिन्यांच्या काळात तब्बल २0 लाख किलो कचरा उचलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या जानेवारीपासून कचऱ्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. किनाऱ्यांवरील कचरा उचलण्याचे काम दृष्टी लाइफ सेविंग कंपनीकडे दिले असून या कपंनीने या सेवेचे १६ महिने पूर्ण केले. किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या या कंपनीला १७ डिसेंबर २0१६ रोजी कचरा उचलण्याचे काम दिले होते. किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते. १७ डिसेंबर २0१६ ते १५ एप्रिल २0१८ या कालावधीत १९ लाख ९0 हजार २५0 किलो कचरा उचलल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांच्या काळातच तब्बल १ लाख ८९ हजार ९६८ किलो कचरा गोळा करण्यात आला. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांच्या काळात २ लाख ६७ हजार ४७ किलो कचरा गोळा करण्यात आला होता. या वर्षी पहिल्या तिमाहीत तिपटीने कचरा वाढल्याचे स्पष्ट होते. एका प्रश्नावर शंकर म्हणाले की, शॅकमालक आता कचऱ्याच्या बाबतीत गांभीर्य दाखवून सहकार्य करु लागले आहेत. गेला काही काळ ओला आणि सुका कचरा वेगळा काढण्याबाबत त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. कचरा वाढण्याचे दुसरे एक कारण म्हणजे समुद्राच्या भरतीच्यावेळी समुद्रातून वाहत आलेला कचरा किनाऱ्याला लागतो. खराब हवामानाच्या काळात हा प्रकार सर्रास दिसून येतो.
कचऱ्याबाबत खाते गंभीरच : बाबू आजगांवकर पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर म्हणाले की, गेले वर्षभर कंपनीच्या कामावर आम्ही बारकारईने नजर ठेवून आहोत. कचरा उचलण्याच्या कामात कोणतीही कसूर ठेवता कामा नये, असा इशारा वेळोवेळी आम्ही दिलेला आहे त्यामुळे कामही चांगल्या पध्दतीने चालले आहे. देश, विदेशातून येणाºया पर्यटकांना किनारे स्वच्छ मिळायला हवेत, ही आमची भूमिका आहे. कोठेही कचरा दिसल्यास फोटो काढून वॉटसअपवर पाठवल्यास २४ तासांच्या आत कारवाई केली जाते. त्यामुळे लोकांनीही सहकार्य करायला हवे.