लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात सध्या जवळपास ४०० नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. राज्यातील लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार राज्यात २०० कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. नीती आयोगाच्या कार्यशाळेत गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रामधून महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत.
नीती आयोगाच्या कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'नीती आयोगाच्या मदतीने गोवा व्हिजन डॉक्युमेंट २०४७ तयार करणार आहे. यामध्ये पुढील २५ वर्षांसाठी धोरणात्मक नियोजन करणार आहे.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'केंद्र व राज्य सरकारचा सरकारचे प्राधान्य महिलाभिमुख विकास हेच आहे. स्वयंपूर्ण गोवा व आत्मनिर्भर भारत उपक्रमातून आम्ही लोकांपर्यंत जात आहोत. स्वयंपूर्ण गोवा ०.२ उपक्रमांतर्गत युवक, महिलांना कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण दिले जात आहेत. राज्यातील अप्रेंटिसशिप योजनेत १०,००० युवकांनी संधीचा लाभ घेतला. विश्वकर्मा योजनेत राज्यातील पारंपरिक व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. सर्व अठराही प्रकारचे व्यावसायिक लाभ घेऊ शकतील.'