लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा प्रदेश काँग्रेसने इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी काल, रविवारी २१ कलमी जाहीरनामा घोषित केला. म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढणार, कोळसा वाहतूक बंद करणार, सरकारी व खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य, आदी आश्वासने देण्यात आली आहेत.
काँग्रेस भवनात जाहीरनामा प्रकाशित करताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, उत्तरचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप, दक्षिणचे उमेदवार विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्टा व आमदार कार्ल्स फेरेरा उपस्थित होते.
जाहीरनाम्यामध्ये कायदेशीर खाणी सुरू करणार, दाबोळी विमानतळ चालूच राहावा यासाठी उपाययोजना, आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणार, महिला सबलीकरणासाठी उद्योजकतेला प्रोत्साहन, महामार्गालगत स्थानिक विक्रेत्यांसाठी विशेष विभाग, कारागीर तसेच खेळाडूंना प्रोत्साहन, पर्यटन क्षेत्राचा फेरआढावा घेऊन सुधारणा, पर्यावरणाभिमुख उद्योग, शैक्षणिक सुविधा वाढवणार, जमिनी विक्रीवर निबंध, फक्त गोवेकरांनाच जमिनी विकत घेता येणार, एसटींना राजकीय आरक्षण, आदी आश्वासने देण्यात आलेली आहेत.
कोट्यवधी खर्चुन २५१ जणांना हंगामी नोकऱ्या : पाटकर
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, रेल्वे दुपदरीकरण, अभयारण्यातून होणार असलेला राष्ट्रीय महामार्ग विस्तार व तामनार वीज प्रकल्प हे तिन्ही प्रकल्प केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास मोडीत काढणार आहे. सरकार भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, ४ कोटी रुपये खर्च करून मेगा जॉब फेअर आयोजित केला. परंतु, प्रत्यक्षात २५१ जणांनाच त्याही हंगामी नोकऱ्या मिळाल्या.
अपघात, खुनांचे 'डेस्टिनेशन', तर बलात्कारांची राजधानी
राज्यात दररोज अपघात होत आहेत. गोवा हे अपघात, खुनांचे डेस्टिनेशन, तर बलात्कारांची राजधानी बनली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते पक्षनेते युरी यरी आलेमाव यांनी केली. सरकारी जावई असलेल्या कंत्राटदाराने महामागचि काम अत्यंत निकृष्टरित्या केले. 'रोड इंजिनिअरिंग' योग्य प्रकारे झालेले नाही. 'डबल इंजिन सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. लोकांमध्ये असलेला संताप, त्यांच्या तीव्र भावना आम्हाला प्रचाराच्यावेळी दिसून येतात. पुढील पुढील दहा दिवसांत घरोघर जाऊन आम्ही सरकारचे अपयश लोकांसमोर मांडणार आहोत, असेही आलेमाव म्हणाले.