वास्को: दक्षिण गोव्यातील वेर्णा पोलीस स्थानकावरील दोन महीला पोलीस शिपायांना धक्का देऊन एका पुरूष पोलीस शिपायाची मारहाण करण्याबरोबर पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशावर हात घातल्याप्रकरणी पोलीसांनी २१ वर्षीय रीजील फर्नांडीस यास अटक केली आहे. पिर्णी जंक्शनसमोरील महामार्गावरून रिजील विना हेल्मेट दुचाकीने जात असताना पोलीसांनी त्यास अडवून दुचाकीचा परवाना दाखवण्यास सांगितले असता त्यांनी पोलीसांवर हल्ला केला. सदर घटना घडल्याच्या काही मिनीटानेच वेर्णा पोलीसांनी कारवाई करून मांजो, वेर्णा येथील रिजील यास गजाआड केली.
वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी (दि. १८) संध्याकाळी ६.३० वाजता सदर घटना घडली. पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक संकेत तळकर यांच्यासहीत पोलीस शिपाई सतीश लाकाडे व अन्य दोन महीला पोलीस शिपाई वेर्णा - पिर्णी जंक्शनसमोर वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी उपस्थित होते. याच वेळी दुचाकीने या महामार्गावरून रीजील फर्नांडीस नावाचा तरूण विना हेल्मेट जात असल्याचे पोलीसांना दिसून येताच त्यांनी त्याला अडवून दुचाकीचा परवाना दाखवण्यास सांगितले. यावेळी रिजील फर्नांडीस यांनी पोलीसांशी हुज्जत घालण्यास सुरू करून आपण येथील स्थानिक असल्याचे सांगण्यास सुरवात केल्याची माहीती पोलीस दिली. विना हेल्मेट दुचाकी चालवून वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याने दुचाकीचा परवाना दाखव अशी मागणी पोलीसांनी पुन्हा केल्यानंतर त्यांने येथे असलेल्या दोन्ही महीला पोलीसांना धक्का दिला. तसेच पोलीस शिपाई सतीश लाकाडे याच्यावर लाथ मारून त्याची मारहाण केल्याची माहीती पोलीसांनी दिली. येथे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संकेत तळकर याच्या गणवेशावर हात घालून त्यावर असलेली नावाचा बिल्ला तोडल्याची माहीती पोलीसांनी दिली. सदर प्रकरण घडल्यानंतर वेर्णा पोलीसांनी त्वरित कारवाई करून रीजील फर्नांडीस ला गजाआड करून नंतर अटक केली. मांजो, वेर्णा येथे राहणाºया २१ वर्षीय रीजील फर्नांडीस विरुद्ध भादस ३५३, ५०४, ४२७ कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिली. सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.