सुशांत कुंकळयेकर
मडगाव - मागच्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा गोव्यात अंमली पदार्थाच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत असून हे वर्ष संपायला एक महिना बाकी असताना आतापर्यंत या व्यवसायात सामील असलेल्या संशयितांचा आकडा 217 पर्यंत पोहोचला आहे. 2017 च्या तुलनेत हे प्रमाण 38 ने अधिक आहे. 2017 साली 179 जणांना अमली पदार्थाच्या व्यवहारात अटक केली होती. मागची पाच वर्षाची आकडेवारी पाहिल्यास गोव्यात 2014 पासून आता तब्बल 594 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
गोव्यात पर्यटन मौसम सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत असतानाच अमलीपदार्थ विषयक 35 प्रकरणांची नोंद गोव्यात झाली असून त्यात 35 जणांना अटक करण्यात आली आहे. पर्यटन मौसम सुरू होण्यापूर्वी गोव्यात गांजा मोठ्या प्रमाणावर विकला जात होता. आता ती जागा चरस व इतर सिंथेटीक ड्रग्सनी घेतली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात गोव्यात गांजा संदर्भातील 16 तर चरस व इतर सिंथेटीक ड्रग्स संदर्भातील 19 प्रकरणांचा समावेश आहे.
अमली पदार्थ विभागातून शुक्रवारी निवृत्त झालेले पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गोव्यात पर्यटन मौसम सुरू झाल्यानंतर चरसची मागणी एकदम वाढल्याने गोव्यातील डिलर्सनी नेपाळकडे संधान बांधल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. त्याशिवाय हिमाचल प्रदेशातूनही गोव्यात चरस आणला जात असल्याचे उघडकीस आले आहे. 1990 च्या सुमारास गोव्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ या देशातून चरस आणला जायचा. मात्र नंतर हे प्रमाण कमी झाले होते मात्र आता पुन्हा नेपाळहून मोठय़ा प्रमाणावर चरस गोव्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.
गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतीयांमध्ये प्रचलित असलेला गांजा मात्र कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, तमिळनाडू व पश्चिम बंगाल यामार्गे गोव्यात येत असल्याचे दिसून आले आहे. चालू 2018 वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात गोव्यात ड्रग्सच्या 208 प्रकरणांची नोंद झाली असून आतारपर्यंत या प्रकरणात 217 जणांना अटक करण्यात आली आहे. 2017 साली 158 प्रकरणात 179 संशयितांना अटक करण्यात आली होती. 2014 ते 2016 या या तीन वर्षाचे प्रमाण पाहिल्यास 2017 आणि 2018 या दोन वर्षात गोव्यातील ड्रग्स व्यवसायात 400 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
2014 साली गोव्यात 54 प्रकरणात 58 जणांना अटक करण्यात आली होती. यावर्षी एकूण 2.9 कोटींचे अमली पदार्थ पकडले होते. 2015 साली 61 प्रकरणांत 71 जणांना अटक करण्यात आली. यावर्षी 10.59 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. 2016 साली 60 प्रकरणांत 69 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यावेळी 1.2 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. 2017 साली एकूण साडेतीन कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले होते. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, यंदा अशा प्रकरणात सामील असल्यामुळे अटक केलेल्या संशयितांपैकी बहुतेक जण भारतीय असले तरी नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, इज्रायल, अमेरिका, जर्मनी, रशिया, सुदान, घाना, ब्रिटीश व नेपाळच्या नागरिकांचा त्यात समावेश आहे.