लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कदंब बसमधून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून २२ दिवसांचा पास देण्यात येणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे चेअरमन व नावेलींचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.
मडगाव येथे काल, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुयेकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. जे कर्मचारी दररोज कदंब महामंडळाच्या बसने प्रवास करतात त्यांना मासिक पासमध्ये सबसिडी देण्यात आली होती. खरे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराबरोबर टीए-डीए दिला जातो. मग कदंबच्या पासमध्ये पुन्हा सबसिडी का? त्यासाठी ही सबसिडी बंद करून केवळ २२ दिवसांचे पूर्ण पैसे घेऊन पास देण्यात येईल. जर त्यांना शनिवार, रविवार प्रवास करायचा असेल तर या पासचा वापर ते करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला तात्पुरते पास दिले जातील व पुढील १५ दिवसांनंतर नियमित पास देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कदंब महामंडळाला सुमारे २ कोटी रुपये नुकसान दर वर्षाला सोसावे लागते.
दक्षिण गोव्यात 'माझी बस योजनेखाली ५५ बस घेण्यात आल्या आहेत. त्यांना दर आठवड्याला पैसे दिले जातात. शाळांसाठी १५० स्कूल बसची आवश्यकता आहे. उत्तर गोव्यात 'माझी बस' योजनेखाली कमी बस आहेत. सध्या गोव्यातून बाहेर राज्यात जाणाऱ्या आंतरराज्य बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. लवकरच आणखीन ५० बस घेतल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार तुयेकर यांनी सांगितले.
... म्हणून त्या विद्यार्थ्यांना उतरवले
गेल्या आठवड्यात कदंब बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची तक्रार एका बिगर सरकारी संघटनेने केल्याने कदंब बसमधून १० विद्यार्थ्यांना खाली उतरवण्यात आले व नंतर खाली उतरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये चढवून त्यांना शाळेत पाठवण्याची व्यवस्था केली, असेही तुयेकर यांनी यावेळी स्पष्ट केली.