ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २ - गोव्यात २०१३ पासून आतापर्यंत पोलिसांनी २३ जणांचे मोबाईल फोन टॅप केल्याची माहिती गोवा विधानसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी पोलीसांनी ही कारवाई केल्याचेही त्यात म्हटले आहे.
फोन टॅपिंगचा मुद्दा गोव्यात अनेकवेळा गाजला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती हक्क कार्यकर्त्यांनीही आपले फोन टॅप केले जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पोलिसांकडून फोन टॅपिंग होत असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कबुल केले आहे. परंतु ते विशिष्ठ कारणासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून करण्यात आल्याचे म्हटले आहे. नुवेंचे आमदार मिकी पाशेको यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की वषॅ २०१३ पासून आतापर्यंत २३ जणांचे फोन टॅप करण्यात आले आहेत. परंतु कुणाचे फोन टॅप करण्यात आले होते याची माहिती पोलीस देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच टॅपिंग दरम्यान मिळालेली माहितीही गुप्त ठेवली गेल्याचे उत्तरात म्हटले आहे. ही कारवाई कायद्ये व नियमांना अनुसरूनच करण्यात आल्याचे म्हटले आहे.